पत्नी हसीन जहाँच्या गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेल्या भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. मोहम्मद शमीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हसीन जहाँने आपण विवाहित असल्याची माहिती लपवली होती असा आरोप केला आहे. आपली मुलं असल्याची गोष्टही तिने लपवली होती. इतकंच नाही तर ही मुलं आपल्या बहिणीची असल्याची खोटी माहिती तिने दिली होती असा दावा मोहम्मद शमीने केला आहे. बीसीसीआयसोबत करार न झाल्याच्या मुद्द्यावर बोलताना बोर्डाने खूप घाई केल्याचं मत शमीने व्यक्त केलं. ‘बोर्डाने खूपच घाई केली. मी त्यांना आधीपासूनच माझ्याविरोधात लागलेल्या आरोपांची गांभीर्याने आणि अत्यंत बारकाईने चौकशी केला जावी असं सांगत आलो आहे’, असं मोहम्मद शमीने म्हटलं आहे.

हसीन जहाँच्या पहिल्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता मोहम्मद शमीने सांगितलं की, ‘हसीन जहाँचं आधीच लग्न झालेलं असून तिला दोन मुली आहेत याची आपल्याला अजिबात माहिती नव्हती. इतकंच नाही तर लग्नानंतरही याची माहिती देण्यात आली नाही. नंतर ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न होऊ लागला. हसीन जहाँने आपल्या दोन्ही मुलींची माहितीही लपवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मुली आपल्या बहिणीच्या आहेत जिचा मृत्यू झालाय असं मला सांगण्यात आलं’. दोन्ही मुलींची आपण खूप मदत केल्याचं शमीने यावेळी सांगितलं. आपण त्यांना फिरायला घेऊन जायचो, कपडे खरेदी करुन द्यायचो अशी माहिती शमीने दिली आहे.

मोहम्मद शमीला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटकडून लवकरच मोहम्मद शमीची चौकशी सुरू केली जाऊ शकते. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने शमीवर मॅच फिक्सिंगचा थेट आरोप केला नव्हता. पण विदेशी व्यक्तीकडून पैसे घेतल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर बीसीसीआयची अॅडमिनिस्ट्रेटर कमिटी सीओएने अँटी करप्शन युनिटला हसीन जहाँच्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले आहे.

हसीनने आरोप केला होता की, शमीने दुबईत पाकिस्तानच्या अलिस्बा नावाच्या मुलीकडून पैसे घेतले होते. यामध्ये इंग्लंडमध्ये राहणारा उद्योगपती मोहम्मदभाईचाही समावेश होता. हसीनने स्वत: यावेळी उपस्थित असल्याचा दावा केला होता. हसीनने शमीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत शमी जर स्वत:च्या पत्नीला धोका देऊ शकतो तर देशाला धोका का देऊ शकत नाही, अशी शंका उपस्थित केली होती. दरम्यान, मोहम्मद शमीने मॅच फिक्सिंगच्या आरोपांचा इन्कार केला आहे. देशाला धोका देण्यापूर्वी मी मरणे पसंत करेन असे, शमीने म्हटले आहे.