News Flash

हॅट्ट्रिकवीर!

साऊदम्पटन येथे शनिवारी झालेला भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना अत्यंत चुरशीचा झाला.

दीपाली पोटे-आगवणे

साऊदम्पटन येथे शनिवारी झालेला भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना अत्यंत चुरशीचा झाला. भारताने अफगाणिस्तानवर ११ धावांनी सनसनाटी मात करून विजयी घोडदौड कायम ठेवली. या लढतीत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्याने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अखेरच्या षटकात अफगाणिस्तानला १६ धावांची गरज असताना तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे मोहम्मद नबी, आफताब आलम आणि मुजीब उर रहमान यांना बाद करीत शमीने हॅट्ट्रिक नोंदवली. विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत हॅट्ट्रिक नोंदवणारा शमी एकूण १०वा आणि भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या गौरवशाली अध्यायाला १९७५ मध्ये प्रारंभ झाला. मात्र एका तपानंतर म्हणजेच १९८७ मध्ये झालेल्या विश्वचषकात भारतीय वेगवान गोलंदाज चेतन शर्माने नागपूर येथे न्यूझिलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात केन रुदरफर्ड, इयान स्मिथ आणि इवेन चॅटफिल्ड यांना बाद करत विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली. हॅट्ट्रिकच्या पुनरावृत्तीसाठी आणखी १२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. १९९९ मध्ये झालेल्या विश्वचषकात पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकने झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात हेन्री ओलोंगा, अ‍ॅडम हकल आणि पॉमी एम्बांगवा यांना बाद करीत हा पराक्रम साकारला.

त्यानंतर मात्र हॅट्ट्रिकची मालिका प्रत्येक विश्वचषकात अनुभवायला मिळाली. २००३च्या विश्वचषकात प्रथमच दोन हॅट्ट्रिक झाल्या. श्रीलंकेच्या चामिंडा वासने बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यातील पहिल्याच षटकात हनन सरकार, मोहम्मद अश्रफूल आणि एहसानूल उल हक यांना बाद केले. तसेच ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने केनियाविरुद्धच्या सामन्यात केनेडी ओटिनो, ब्रिजल पटेल आणि डेव्हिड ओबुया यांना माघारी पाठवून हे यश मिळवले.

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावावर विश्वचषकातील दोन हॅट्ट्रिकची नोंद आहे. २००७मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मलिंगाने चार चेंडूंवर चार फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली होती. शेन पोलॉक, अँडय़ू हॉल, जॅक कॅलिस आणि मखाय एन्टिनी यांना त्याने बाद केले. त्यानंतर २०११च्या विश्वचषकात मलिंगाने केनियाविरुद्धच्या सामन्यात तन्मय मिश्रा, पीटर ओनगोंडो आणि शेम एन्गोचे यांना बाद केले. याच विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या केमार रोचने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात पिटर सीलार, बर्नार्ड लूट्स, बेरेंड वेस्टडिक यांना बाद केले. वेस्ट इंडिजची ही विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक ठरली.

२०१५च्या विश्वचषकातसुद्धा दोन हॅट्ट्रिक नोंदल्या गेल्या. इंग्लंडचा गोलंदाज स्टीव्हन फीनने परंपरागत प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बॅड्र हॅडिन, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल जॉन्सन यांना बाद केले. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या जेपी डय़ुमिनीने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अँजेलो मॅथ्यूज, नुवान कुलसेकरा आणि थरिंदू कौशल यांचे बळी घेतले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रकारामध्ये आतापर्यंत ४७ हॅट्ट्रिक नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भारताचे गोलंदाज चेतन शर्मा, कपिलदेव आणि कुलदीप यादव आणि आता मोहम्मद शमीचा समावेश आहे, तर कसोटी क्रिकेटमध्ये ४३ हॅट्ट्रिकची आहे. त्यात हरभजन सिंग आणि इरफान पठाण या भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे. परंतु ट्वेन्टी-२० प्रकारांमधील हॅट्ट्रिकच्या यादीत भारताने अजून खाते उघडलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2019 11:45 pm

Web Title: hat trick icc cricket world cup 2019
Next Stories
1 भारतीय फलंदाजांनी चुका सुधाराव्यात!
2 खुदा गवाह!
3 क्रिकेटचा देव जसप्रीत बुमराहवर प्रसन्न ! अफगाणिस्तानविरुद्ध गोलंदाजीचं केलं कौतुक
Just Now!
X