करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका देशभरात बहुतांश व्यक्तींना बसला. अनेक उद्योगधंदे या काळात ठप्प पडल्यामुळे अनेकांचा रोजगारही तुटला. याचसोबत परदेशात काम करणाऱ्या भारतीय व्यक्तींनाही या काळात आपली नोकरी गमवावी लागल्यामुळे त्यांच्यावर कठीण प्रसंग आला. सुरुवातीला लॉकडाउनमुळे परदेशातून कोणत्याही व्यक्तीला भारतात येण्याची परवानगी नव्हती. यानंतर केंद्र सरकारने वंदे मातरम अभियानाअंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना विमान, सागरीमार्गे भारतात आणण्यास सुरुवात केली. भारतीय माजी फुटबॉलपटू गौरमांगी सिंगची पत्नी कमांडर पुष्पांजली एअर इंडियामध्ये कार्यरत आहे. जगभरातील विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारच्या वंदे मातरम अभियानात पुष्पांजलीने महत्वाची भूमिका बजावली आहे.

परंतू सध्या आपल्या कामाची जबाबदारी आणि लॉकडाउनमुळे पुष्पांजली नवी दिल्लीत आहे. या काळात आपल्या पतीला तिला भेटता येत नाहीये. पण गौरमांगीला आपली पत्नी करत असलेल्या कामाचा अभिमान आहे. “खडतर काळात तुमच्या परिवारातला एक व्यक्ती देशासाठी काहीतरी चांगलं करतोय हे ऐकून खरंच खूप आनंद वाटतो. हे काम खरंच खूप थकवणारं आहे याची मला कल्पना आहे. मला तिची काळजी वाटत नाही, असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरेल. गेल्या आठवड्यात ती आफ्रिकेत अडकलेल्या भारतीय व्यक्तींना परत आणणाऱ्या विमानात होती. या कामात तुम्ही बाधित व्यक्तीच्या संपर्कात येण्याची सतत भीती असते. पण या सर्व गोष्टींवर मात करुनही ती आपलं कर्तव्य बजावतं आहे. ती माझी बायको आहे याचा मला अभिमान आहे.” गौरमांगी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

पुढील काही दिवसांमध्ये गौरमांनीने दिल्ली जाऊन बायकोला भेटण्याचं ठरवलं आहे. नॅशनल फुटबॉल लिग, फेडरेशन कप, I लिग अशा महत्वाच्या स्पर्धांमध्ये गौरमांगीने संघाचं यशस्वी प्रतिनीधीत्व केलं आहे. लॉकडाउन काळात तो नॉर्थइस्टमधील आपल्या घरात राहून ऑर्गेनिक शेती करण्यात रमला होता.