16 October 2019

News Flash

अभिनव क्रीडा दायित्व

भारतातील काही मोठय़ा औद्योगिक घराण्यांनी त्यांची क्रीडा क्षेत्रासाठी असलेली बांधिलकी जपण्याचे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळातदेखील केल्याचे दाखले आहेत.

|| धनंजय रिसोडकर

भारतातील काही मोठय़ा औद्योगिक घराण्यांनी त्यांची क्रीडा क्षेत्रासाठी असलेली बांधिलकी जपण्याचे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळातदेखील केल्याचे दाखले आहेत. अर्थात, असे कार्य करणारे समूह अगदी तुरळकच. तसेच बहुतांश वेळा या समूहांकडूनही केवळ निधी देऊन त्यांचे दायित्व पार पाडले जाते. मात्र, तमिळनाडूतील हॅटसन अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स या समूहाने सामाजिक दायित्वांतर्गत एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. केवळ निधी देऊन अन्य जबाबदारी झटकण्याऐवजी त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॅटसन बॅडमिंटन केंद्राची उभारणी करीत आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचा ध्यास घेतला आहे. तसेच अवघ्या दीड वर्षांत पाच राष्ट्रीय पदकविजेते खेळाडू घडवत त्यांच्या ध्येयाच्या दिशेने झेप घेतली आहे. भारतातील १२ ते १७ वयोगटातील बॅडमिंटनच्या प्रतिभेला पैलू पाडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवणारे केंद्र म्हणून ते नावारूपास येण्यास प्रारंभ झाला असून नजीकच्या भविष्यात भारतातील बॅडमिंटन अकादमींमधील प्रमुख अकादमीत त्यांचा समावेश झाल्यास कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.

उद्योग समूहांनी त्यांच्या नफ्याचा ५ टक्के भाग हा उद्योगांचे सामाजिक दायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) म्हणून खर्च करावा, असा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आणि समूह त्यांच्या नफ्याचा काही भाग हा विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक किंवा तत्सम उपक्रमांसाठी वापरण्याची सामान्य पद्धती भारताच्या उद्योग जगतात बऱ्यापैकी रुजली आहे. बहुतांश वेळा हा निधी सामाजिक संस्थांना देऊन त्यांच्या माध्यमातून हा सामाजिक कार्याचा सोपस्कार उरकण्याचे काम या उद्योग समूहांकडून केले जाते. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्याच संस्था किंवा समूह क्रीडा क्षेत्रासाठी सामाजिक दायित्व म्हणून काही निधी खर्च करतात. मात्र, त्यादेखील तो निधी संबंधित संघटनांकडे किंवा एखाद्या नामांकित क्रीडा अकादमीस किंवा संबंधित प्रशिक्षकाकडे सोपवून अन्य जबाबदारीतून अंग काढून घेतात. अशा वातावरणात एखादी कंपनी सामाजिक दायित्व म्हणून जर क्रीडा क्षेत्रासाठी काही ठोस निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर तो नक्कीच स्तुत्य ठरतो.

समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. जी. चंद्रमोगन हे स्वत: बॅडमिंटनचे माजी खेळाडू आणि चाहते असल्याने त्यांनी ठरवले की त्यांच्या कंपनीचा सामाजिक दायित्व निधी हा क्रीडा क्षेत्रासाठीच खर्च करायचा. विशेषत्वे बॅडमिंटनचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी करायचा. त्यासाठी मग त्यांनी मदुराईपासून सव्वा तासांच्या अंतरावर असलेल्या शिवकाशीजवळच (फटाक्यांचे आगर) असलेल्या र्तीथगल येथे १० एकर जमीन केवळ या प्रकल्पासाठी घेतली. अवघ्या तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या त्या जमिनीवर त्यानंतरच्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन सेंटरची उभारणी केली. तसेच या अभिनव उपक्रमाच्या आखणीसह त्याची संपूर्ण जबाबदारी पार पाडण्यासाठी कनिष्ठ गटातील माजी राष्ट्रीय विजेते आणि वास्तुविशारद अजित हरदास यांची निवड केली. हरदास यांनी कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात राष्ट्रीय स्तरापर्यंत बॅडमिंटन खेळलेले असल्याने खेळाडूंना येणाऱ्या समस्यांची त्यांना जाणीव होती. तसेच वास्तुविशारद असल्याने अत्याधुनिक वास्तुरचना आणि खेळाडूंसाठी सर्वोत्तम रचना कशी असावी, त्याची जाण असल्याने अत्यंत आकर्षक आणि भव्य अशा बॅडमिंटन सेंटरची उभारणी त्यांनी केली. या केंद्रात नुकतेच ऑल इंग्लंडचे आठ वेळचे विजेते, ऑलिम्पिक सुवर्णविजेते माजी बॅडमिंटनपटू रूडी हारतोनो यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह मौलिक सल्ले दिले. अशा प्रकारचे विविध आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मार्गदर्शन देऊन येत्या तीन वर्षांत सिंधू, सायना, श्रीकांतप्रमाणेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचा निर्धार भारताला बॅडमिंटनमधील महासत्ता बनवण्याच्या दिशेने हातभार लावणारा ठरणार आहे.

कठोर परिश्रमासह परिपूर्णतेचा ध्यास

या केंद्रावर दाखल होणाऱ्या उगवत्या बॅडमिंटनपटूंसाठी निवास आणि अत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण अशी व्यायामशाळा, खेळाडूंना पूरक ठरणाऱ्या आहाराची निर्मिती करणारे स्वयंपाकघर आणि कॅफेटेरिया तसेच जलतरण तलावासह पुनर्वसन केंद्राचीही निर्मिती करण्यात आली आहे. तसेच निवासी ५२ खेळाडूंपैकी मुला-मुलींसाठी स्वतंत्र आणि प्रशिक्षकांसाठी अत्याधुनिक वसतिगृह तयार करून केवळ खेळावरच लक्ष केंद्रित करण्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे. विविध चाचण्यांमधून पार पडत एकदा या केंद्रात खेळाडू आला की त्याला सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत पूर्ण बॅडमिंटनमय करून त्याच्या खेळाच्या प्रगतीला वेग देण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा पूर्ण वेळ हा खेळाडूंनी खेळ, पूरक व्यायाम, आहार, आवश्यक आराम आणि जलतरणाच्या मनोरंजनातच व्यतीत करणे बंधनकारक आहे. खेळाडूंना त्यांचा मोबाइलदेखील केवळ शनिवार आणि रविवार असे दोनच दिवस वापरण्यासाठी दिला जातो. एकप्रकारे खेळाडूंना अन्य कोणत्याही अडथळ्यांविना बॅडमिंटनवर एकाग्र होण्यासाठीची सर्व साधनसुविधा उपलब्ध करून परिपूर्ण बॅडमिंटनपटू घडवण्याचा ध्यास घेण्यात आला आहे.

केवळ दोन-तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवून भारताचा कायमस्वरूपी दबदबा राहणार नाही. त्यासाठी सातत्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे अव्वल बॅडमिंटनपटू घडवण्याच्या ध्यासातून हे केंद्र उभारले असून त्याला अगदी भरभरून प्रतिसाद लाभत आहे. येत्या दोन वर्षांत या केंद्रातील १६ बॅडमिंटन कोर्ट वाढवून ३२ करण्यासह सर्व साधनसुविधांमध्ये दुपटीने भर घालण्यात येणार आहे.     – आर. जी. चंद्रमोगन, हॅटसन अ‍ॅग्रो समूहाचे अध्यक्ष

First Published on December 7, 2018 1:49 am

Web Title: hatsun badminton centre