सर्बियाच्या २३ वर्षीय जोकोव्हिच याने यापूर्वी २००८, २०११ व २०१२ मध्ये ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळविला होता. त्याचे ग्रँड स्लॅम स्पर्धेतील हे सहावे विजेतेपद आहे. त्याने २०११ मध्ये विम्बल्डन व अमेरिकन या दोन्ही स्पर्धा जिंकल्या होत्या तर गतवर्षी या दोन्ही स्पर्धामध्ये तो उपविजेता ठरला होता.
ब्रिटिश खेळाडू मरे याने गतवर्षी ऑलिम्पिक सुवर्णपदकाबरोबरच अमेरिकन स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी त्याचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम अजिंक्यपद होते. त्यामुळेच येथे तो विजेतेपद मिळविण्यासाठी उत्सुक होता.
जोकोव्हिच याने मरे याच्याविरुद्ध तीन तासापेक्षा जास्त चाललेल्या अंतिम लढतीत अव्वल दर्जाचा खेळ केला. मरे याने उपांत्य फेरीत माजी विजेता रॉजर फेडरर याच्यावर पाच सेट्सनंतर हरविले होते व अंतिम लढतीबाबत उत्सुकता निर्माण केली होती. त्याने जोकोव्हिचविरुद्ध टायब्रेकरद्वारे पहिला सेट घेतला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिच याला सूर गवसला. या सेटमध्येही मरे याने बहारदार खेळ केला. तथापि टायब्रेकरमध्ये जोकोव्हिच याने मरे याच्या सव्‍‌र्हिस परतविण्यात यश मिळविले. त्याने टायब्रेकर घेत हा सेट घेतला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी केली.
दुसरा सेट घेतल्यानंतर जोकोव्हिच याचा आत्मविश्वास वाढला. त्याने संयमपूर्ण खेळाबरोबरच सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर चांगले नियंत्रण ठेवले. त्याने व्हॉलीज व नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. तिसऱ्या सेटमध्ये त्याने मरेची सव्‍‌र्हिस तोडण्यात यश मिळविले. हा सेट घेत त्याने सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली.
चौथ्या सेटमध्ये क्रॉसकोर्ट फटक्यांचा लीलया उपयोग करीत त्याने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. हेच ब्रेक निर्णायक ठरले.

हे माझे आवडते मैदान
केवळ एकदा नव्हे तर चौथ्यांदा येथे विजेतेपद मिळाल्यामुळे आणि त्यातही हॅट्ट्रिक विजेतेपद मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. येथील मैदान मला नेहमीच अनुकूल राहिले आहे. या मैदानाचा मी आयुष्यभर ऋणी आहे असे सांगून जोकोव्हिच म्हणाला, ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचे मनोमन आभार मानणे मला जरुरीचे वाटते, कारण त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी हे यश मिळवू शकलो आहे. मरे हा अतिशय जिगरबाज खेळाडू आहे. दुसऱ्या सेटपासून त्याच्या खेळातील सातत्य कमी झाले अन्यथा हा सामना आणखी रंगतदार झाला असता.

ब्रायन बंधूंचे १३वे जेतेपद
बॉब आणि माइक ब्रायन या अमेरिकेच्या जोडीने पुरुष दुहेरीतील आपली मक्तेदारी सिद्ध करत तेराव्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घातली. नेदरलॅण्डसच्या रॉबिन हास- इगोर सिजसलिंग जोडीवर ६-४, ६-३ अशी सरळ सेट्समध्ये मात करत दिमाखदार विजय साकारला.

सर्व ग्रँडस्लॅम जेतेपदे खुणावत आहेत  ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद कायम राखल्याने सर्वच ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. प्रत्येक ग्रँडस्लॅम स्पर्धा स्वतंत्र आणि विशेष आहे. आकडेवारीमध्ये मला स्वारस्य नाही. प्रत्यक्ष कोर्टवर सर्वोत्तम प्रदर्शनाला महत्त्व आहे. यंदाचा जेतेपदापर्यंतचा प्रवास रोलर कोस्टर राइडसारखा होता. दुखापतींनी मोक्याच्या क्षणी उचल खाल्ली, मात्र माझ्या सहयोगी संघाने सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी माझी काळजी घेतली म्हणूनच जेतेपद प्रत्यक्षात साकारू शकले. सेरेनाविरुद्धची कामगिरी सुधारण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे अझारेन्काने सांगितले. तिने ली नाला ४-६, ६-४, ६-३ असे नमवत ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद कायम राखले. या जेतेपदासह अझारेन्काने क्रमवारीतील अव्वल स्थानावरही वर्चस्व राखले आहे.