18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

महाराष्ट्राने लागोपाठ तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवीत ४६व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवली. मात्र

मिलिंद ढमढेरे बारामती | Updated: December 13, 2012 4:19 AM

पुरुषांमध्ये रेल्वेचा जेतेपदावर कब्जा
वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा
महाराष्ट्राने लागोपाठ तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवीत ४६व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवली. मात्र गेले दोन वर्षे विजेतेपदापासून वंचित राहणाऱ्या महाराष्ट्राच्या पुरुष संघाला अखेर उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. रेल्वे संघाने त्यांना पराभूत करत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली.
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेतील पुरुषांच्या अंतिम सामन्यात रेल्वेने महाराष्ट्राचे विजेतेपदाचे स्वप्न भंग करताना १६-१३ असा विजय मिळविला. मध्यंतराला त्यांच्याकडे असलेली ८-६ ही निर्णायक ठरली. महाराष्ट्र संघ आतापर्यंत ३८ वेळा विजेता ठरला आहे.
महिलांमध्ये महाराष्ट्राने केरळवर १०-९ अशी एक गुण व ६ मिनिटे ५० सेकंद राखून पराभव केला. महाराष्ट्राने राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या १४ व्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. पुरुष गटात दहा महाराष्ट्राच्याच खेळाडूंचा समावेश असलेला रेल्वेचा संघ गेले दोन वर्षे विजेता ठरला होता, त्यामुळेच या अनुभवी खेळाडूंचा संघ पुन्हा विजेतेपद मिळवेल अशीच शक्यता होती. पहिल्याच डावात रेल्वेने धारदार आक्रमणाचा प्रत्यय घडविला. त्यांनी पहिल्या अडीच मिनिटांतच महाराष्ट्राचे तीन गडी बाद करत आपली बाजू बळकट केली. तुलनेत महाराष्ट्राने आक्रमणात खूपच चुका केल्या. खुंटावर गडी मारण्याचे त्यांचे अनेक प्रयत्न अपयशी ठरले. रेल्वेच्या खेळाडूंनी चांगल्या हुलकावण्या देत सुरेख पळती केली.
रेल्वे संघाकडून अमोल जाधव (३ गडी व दोन्ही डावात दीड मिनिटे), विलास करंडे (दीड मिनिटे व २ मिनिटे ५० सेकंद व दोन गडी) यांनी अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडवला. त्यांना राहुल तामगावे (२ मिनिटे) व महेश मलगे (३ गडी) यांची योग्य साथ लाभली. महाराष्ट्राकडून नरेश सावंत (दीड मिनिटे व २ मिनिटे) तक्षक गौंडाजे (२ मिनिटे) व अनिकेत चऱ्हाटे (३ गडी) यांची लढत अपुरी ठरली. रेल्वेचा कर्णधार अमोल जाधव याने विजेतेपदाची खात्री होती, असे सांगितले. तो म्हणाला, ‘‘महाराष्ट्राच्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा आम्हाला सराव असल्यामुळे त्यांच्या उणिवा कशात आहेत, हे आम्ही ओळखले होते. तथापि घरच्या मैदानावर महाराष्ट्राचे खेळाडू खेळत असल्यामुळे व प्रेक्षकांचा पाठिंबा त्यांना मिळणार होता त्यामुळे थोडेसे दडपण होते.’’
महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रापुढे केरळचे आव्हान होते. महाराष्ट्राने  मध्यंतराला महाराष्ट्राने ९-५ अशी आघाडी घेत जवळपास विजय निश्चित केला होता. महाराष्ट्राकडून कीर्ती चव्हाण (१ मि. १० सेकंद, १ मि. २० सेकंद व एक गडी), कर्णधार प्रियंका येळे (२ मिनिटे, अडीच मिनिटे व २ गडी) सारिका काळे (२ मिनिटे २० सेकंद व ३ मिनिटे) यांनी सुरेख खेळ केला. शिल्पा जाधव हिने पहिल्याच डावात पाच गडी बाद करत महाराष्ट्राला भक्कम आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. तिला मीनल भोईर हिने दोन गडी बाद करत चांगली साथ दिली. केरळच्या तुलनेत महाराष्ट्राचे आक्रमणात चांगले सांघिक कौशल्य दिसून आले. केरळचे आक्रमण धारदार असले तरी महाराष्ट्राच्या प्रियंका येळे व सारिका काळे यांच्या सातत्यपूर्ण खेळापुढे त्यांचे आक्रमण फिके ठरले. केरळ संघाकडून आक्रमणात व्ही. रेश्मा व के. रेखामोल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. आर. राधिका व व्ही. दिव्या यांनी प्रत्येकी १ मिनिट १० सेकंद पळतीचा खेळ केला. पी. लसिता हिने पहिल्या डावात १ मिनिट २० सेकंद पळती केली तर निजी कुमारी हिने एक मिनिट ४० सेकंद पळतीचा खेळ केला.
महाराष्ट्राची कर्णधार प्रियंका म्हणाली, ‘‘सामनाजिंकण्याचा आत्मविश्वास होता. गेले दोन वर्षे आम्ही विजेते असल्यामुळे यंदा पुन्हा विजेतेपद मिळवित हॅट्ट्रिक करण्याचा आमचा निर्धार होता. पुण्यात झालेल्या प्रशिक्षण शिबिराचा खूप फायदा झाला. विजयाचे श्रेय आमचे प्रशिक्षक नरेंद्र कुंदर यांना द्यावे लागेल.’’
महिलांच्या विभागात दिल्ली संघाने कर्नाटकचा ११-१० असा एक गुण व चार मिनिटे राखून पराभव केला आणि तिसरे स्थान पटकावले. उपांत्य फेरीत महाराष्ट्राने दिल्लीला ९-४ असे एक डाव ५ गुणांनी पराभूत केले होते. केरळने कर्नाटकचे आव्हान ८-६ असे एक डाव आणि दोन गुणांनी संपुष्टात आणले होते. पुरुष गटात कोल्हापूर संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. त्यांनी कर्नाटकवर २९-१७ असा सहज विजय  मिळविला. उपांत्य लढतीत रेल्वेने कर्नाटकला १३-४ असे एक डाव ९ गुणांनी तर महाराष्ट्राने कोल्हापूरला २०-८ असे एक डाव १२ गुणांनी पराभूत केले होते.    

First Published on December 13, 2012 4:19 am

Web Title: hattrick won of maharashtra
टॅग Kho Kho,Sports