काही दिवसांपूर्वी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी श्रीलंका, युएई पाठोपाठ न्यूझीलंडनेही आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याची तयारी दाखवल्याची माहिती दिली होती. परंतू न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्यांनी हा दावा खोडून काढला असून, न्यूझीलंड क्रिकेटने असा कोणताही प्रस्ताव दिलेला नसल्याचं स्पष्ट केलं.

“प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या या फक्त शक्यता आहेत. आयपीएलच्या आयोजनासाठी आम्ही बीसीसीआयला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा आम्ही अजुन तसा विचारही केलेला नाही.” न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ता रिचर्ड बूक यांनी Radio New Zealand शी बोलताना याबद्दल माहिती दिली. न्यूझीलंड क्रिकेटने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर बीसीसीआय अधिकाऱ्याने कोणत्या आधारावर ही माहिती दिली असा प्रश्न आता विचारला जात आहे.

अवश्य वाचा – पहिली पसंती भारतालाच !! आयपीएल आयोजनावरुन सौरव गांगुलीचं महत्वपूर्ण विधान

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला होता. परंतू ४ हजार कोटींचं नुकसान टाळण्यासाठी बीसीसीाय सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. यासाठी बीसीसीआयला आयसीसी टी-२० विश्वचषकाबद्दल नेमका काय निर्णय घेतं हे पहावं लागणार आहे. दरम्यान याच कालावधीत होणारा आशिया चषक रद्द झाल्यामुळे बीसीसीआयसमोरचा एक अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे आयसीसीच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.