भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे गेल्या काही वर्षांपासून आपल्या फॉर्मशी झगडतो आहे. फलंदाजीत अजिंक्यच्या बॅटमधून निघणारा धावांचा ओघ गेल्या काही सामन्यांपासून कमी झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे खुद्द अजिंक्यलाही याची माहिती असून, फिरकीपटूंविरोधात आपला खेळ सुधारण्याची गरज असल्याचं अजिंक्यने सांगितलं आहे. तो भुवनेश्वर येथे पीटीआयशी बोलत होता.

“माझं फलंदाजीचं तंत्र कुठेही चुकत नाहीये, त्यामुळे मला त्याबद्दल चिंता नाहीये. फक्त मला फलंदाजीदरम्यान संयम राखण्याची गरज असून छोट्या खेळीचं शतकात रुपांतर करण्याची गरज आहे. काही क्षणांसाठी सर्व योग्य चालू आहे असं तुम्हाला वाटतं असतं, मात्र निकाल अपेक्षेप्रमाणे लागत नाही. प्रत्येक खेळाडू या परिस्थितीमधून जातो, मात्र अशावेळी तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर राहणं गरजेचं आहे.”

“फिरकीपटूंविरोधात खेळताना मी थोडा चाचपडतोय. त्यांच्याविरोधात माझ्या खेळांमध्ये सुधारणा करणं मला गरजेचं वाटतं. याच कारणासाठी मी विजय हजारे चषकात खेळण्याचा निर्णय घेतला”, रहाणे बोलत होता. वर्षाच्या सुरुवातीपासून रहाणे आपल्या फॉर्मशी झगडतोय. आफ्रिका दौऱ्यात त्याला काही सामन्यांना मुकावंही लागलं होतं. या गोष्टीचा आपल्याला प्रचंड त्रास झाल्याचंही अजिंक्य म्हणाला. गेल्या काही महिन्यांपासून अजिंक्यला भारतीय वन-डे संघात स्थान मिळालेलं नाहीये, मात्र विश्वचषकाआधी आपण वन-डे संघातलं स्थान परत मिळवू असा आत्मविश्वास रहाणेने व्यक्त केला आहे.