पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने रोहित शर्माच्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आफ्रिकेवर २०३ धावांनी मात केली. रोहित शर्माने या सामन्यात दोन्डी डावांत शतक झळकावलं. त्याच्या या आक्रमक खेळीनंतर अनेकांनी त्याची तुलना सेहवागच्या खेळाशी केली. मात्र शोएब अख्तरच्या मते रोहितची फलंदाजी ही सेहवागपेक्षाही सरस आहे. तो आपल्या यू-ट्युब चॅनलवरील व्हिडीओमध्ये बोलत होता.

“रोहितची फलंदाजी ही विरेंद्र सेहवागपेक्षा सरस आहे. सेहवागकडे प्रबळ इच्छाशक्ती आणि आक्रमक पवित्रा होता. याच्याजोरावर तो आक्रमक फलंदाजी करायचा. मात्र रोहितचं तंत्र हे चांगलं आहे. त्याच्या ठेवणीत विविध फटके आहेत. सुरुवातीच्या काळात रोहितचं कसोटी क्रिकेटमध्ये फारसं लक्ष नसायचं मात्र आता तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगलाच सरावला आहे. यापुढे रोहितने जर कोणतंही दडपण न घेता खेळ केला तर तो नेहमी शतकी खेळी करु शकतो.” अख्तरने रोहितची स्तुती केली.

अवश्य वाचा – मोहम्मद शमी रिव्हर्स स्विंगचा बादशहा ठरु शकतो !

रोहितने विशाखापट्टणम कसोटीत पहिल्या डावात १७६ तर दुसऱ्या डावात १२७ धावा केल्या होत्या. या खेळीसाठी रोहितला सामनावीराचा किताब देऊनही गौरवण्यात आलं होतं. दरम्यान या मालिकेतला दुसरा सामना गुरुवारपासून पुण्याच्या गहुंजे मैदानात खेळवला जाणार आहे.