विस्फोटक फलंदाज मयंक अग्रवालची पहिल्यांदाच तिन्ही प्रकारच्या भारतीय संघात निवड झाली आहे. मयंकनं नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मयंकनं ११ सामन्यात १५६.४ च्या स्ट्राइकरेटनं ४२४ धावा चोपल्या होत्या. एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात सलामी फलंदाज म्हणून शिखर धवन खेळणार हे तर नक्की आहे. पण त्याच्यासोबत अग्रवाल, राहुल किंवा शुभमन गिल यांच्यापैकी कोण येणार? याचं चित्र मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण कसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून स्वत: सचिन तेंडुलकरनं मयंकचं समर्थन केलं आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत तीन एकदविसीय सामने, तीन टी-२० सामने आणि चार कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. कसोटी सामन्यात सलामी फलंदाजाबाबत पीटीआयशी बोलताना सचिन म्हणाला की, माझ्या मते सलामीला मयंक अग्रवाल खेळणं जवळपास नक्की आहे. सचिन म्हणाला की, ‘ कसोटी सामन्यात मयंक खेळणार हे नक्की आहे. कारण सध्या तो फलंदाजीत मोठ्या खेळी करत आहे. जर रोहित शर्मा कसोटीमध्ये उपलबद्ध नसेल तर मयंकला खेळवावं. तसेच दुसरा सलामी फलंदाज म्हणून इतर खेळाडूच्या फॉर्मचा विचार करण्यात यावा.’

ऑस्ट्रेलिया संघाबाबत काय म्हणाला सचिन –
यावेळेस ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीचा क्रम तगडा वाटतोय. स्मिथ, वॉर्नर आणि लाबुशाने ऑस्ट्रेलियासाठी महत्वाची भूमिका बजावतील. दोन सिनिअर खेळाडू आणि लाबुशाने यांच्या उपस्थितीमुळे ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजीला आधिक बळकटी आली आहे. तयारीबाबत बोलाल तर भारतीय संघही कोणतीही कमी सोडणार नाही. बॉर्डर-गावसकर चषकावर भारत पुन्हा एकदा नाव कोरण्याची शक्यता असल्याचेही सचिननं सांगितलं.

विराटच्या अनुपस्थितीचा भारताला फटका, पण…..
विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला फटका बसू शकतो. पण भारताची बेंच स्ट्रेंज मजूबत आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे भारत मालिकेत राहणार आहे.

पुजाराचं महत्व –
सचिन तेंडुलकर म्हणाला की, कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराची उपस्थिती भारतीय संघासाठी महत्वाची आहे. पुजारा-विराट या जोडगोळीनं भारताला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढलं आहे.