महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्ती घेणार हा केल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. २०१९ विश्वचषकात उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देऊन ऋषभ पंतला संधी दिली. दरम्यानच्या काळात ऋषभ पंत खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी होत असताना धोनीला संघात स्थान द्या अशी मागणी सुरु झाली होती. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

“मध्यंतरी मी आणि धोनी बोललो, मात्र काय बोलणं झालंय हे मी जाहीर करु शकत नाही. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे, लवकरच तो वन-डे मधून निवृत्ती घेऊ शकतो. यानंतर त्याच्याकडे फक्त टी-२० क्रिकेटचा पर्याय उपलब्ध राहतो. आयपीएल तो निश्चीत खेळतो आहे. एक गोष्ट निश्चीत की धोनी कधीच स्वतः संघावर ओझं बनून राहणार नाही. पण यंदाच्या आयपीएलमध्ये तो चांगला खेळला तर काहीही होऊ शकतं.” News 18 समूहाला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री बोलत होते.

अवश्य वाचा – ना धोनी ना शिखर धवन…असा असेल टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ

टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात आम्हाला खेळाडूंचा फॉर्म आणि अनुभव या दोन्ही गोष्टी पहाव्या लागणार आहेत. ५-६ व्या क्रमांकासाठी कोण चांगलं फलंदाजी करणार हे पहायचं आहे. जर धोनी आयपीएलमध्ये चांगलं खेळला, तर तो देखील स्पर्धेत असेल…शास्त्रींनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आगामी काळात धोनी आपल्या निवृत्तीबद्दल काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.