महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर भारतीय संघाची धुरा विराट कोहलीकडे आली. फार कमी कालावधीमध्ये विराटने भारतीय संघावर आपली पकड मजबूत करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला. विराट आपल्या आक्रमक फलंदाजीसोबत मैदानातल्या आक्रमक स्वभावासाठीही ओळखला जातो. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतिफने विराट कोहलीच्या या आक्रमक स्वभावाचं कौतुक करत, गोलंदाजांनी विराटसोबत पंगा घेऊ नये असा सल्ला दिला आहे.

“२०१४ साली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान धोनीने दोन कसोटी सामन्यांनंतर कसोटीमधून निवृत्ती स्विकारली होती. या मालिकेत विराट कोहलीने दोन शतकं झळकावली. एका सामन्यात ऑस्ट्रेलियाचा मिचेल जॉन्सन आणि विराट कोहलीमध्ये मैदानात चांगलीच जुंपली होती…आणि त्यावेळी विराटची देहबोली ही पाहण्यासारखी होती. तो अजिबात बचावात्मक नव्हता, त्याच्या वागण्यात आक्रमकता होती. काही खेळाडू असे असतात की त्यांच्याशी पंगा घ्यायचा नसतो. पाकिस्तानकडे जावेद मियाँदाद या प्रकारातले खेळाडू होते. व्हिव रिचर्ड्स, सुनिल गावसकर यांच्यासोबत आता विराट कोहलीचं नावही या यादीत जोडलं पाहिजे. नुकत्याच विंडीजविरुद्ध मालिकेतही विराटने केजरिक विल्यम्सला त्याच्यात शैलीत सडेतोड उत्तर देत, बोलती बंद केली होती. त्यामुळे सामन्यादरम्यान गोलंदाजांनी विराटशी पंगा घेऊ नये.” राशिद लतिफ एका यू-ट्युब व्हिडीओला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आश्वासक कामगिरी केली आहे. सध्या करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्व क्रीडा स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता, १५ एप्रिलनंतरही आयपीएल सुरु होईल याची शाश्वती देता येत नाहीये. विराट कोहली आयपीएलमध्ये RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं नेतृत्व करतो.