News Flash

स्वतःच्या खेळात मश्गुल असल्याने सचिन चांगला कर्णधार होऊ शकला नाही !

टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकांनी सांगितलं कारण

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंततर सचिन तेंडुलकरला अनेक वर्ष झाली. आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम मोडणाऱ्या सचिनचे आजही कोट्यवधी चाहते आहेत. १३ वर्षांपेक्षा जास्त खेळलेल्या कारकिर्दीत सचिनने अनेक प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई केली. भारतीय संघाला अनेक सामन्यात विजय मिळवून देण्याच सचिनला महत्वाचा वाटा आहे. याव्यतिरीक्त १०० शतकं, पहिलं द्विशतक झळकावणारा खेळाडू असे एक ना अनेक विक्रम सचिनच्या नावावर आहेत. मात्र कर्णधार म्हणून सचिन आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीत फारसा यशस्वी होऊ शकला नाही. भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि तत्कालीन प्रशिक्षक मदनलाल यांनी यापाठीमागचं कारण सांगितलं आहे.

अवश्य वाचा – सचिन २००७ साली करणार होता क्रिकेटला रामराम !

“सचिन यशस्वी कर्णधार नव्हता असं मी म्हणणार नाही, पण कर्णधारपदाची जबाबदारी असतानाही तो स्वतःच्या खेळात मश्गुल असायचा. आपल्या संघाची काळजी घेणं त्याला फारसं जमलं नाही. कर्णधार म्हणून तुम्ही स्वतःच्या कामगिरीकडे लक्ष देऊन चालत नाही, तुमच्या इतर १० सहकाऱ्यांनीही तितकीच चांगली कामगिरी करावी असा तुमचा प्रयत्न असला पाहिजे. कर्णधार म्हणून तुम्ही हे कसं सांभाळता हे महत्वाचं असतं.” मदनलाल Sportskeeda संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २५ कसोटी आणि ७३ वन-डे सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं. २००० नंतर सचिनने कर्णधारपदासाठी कधीही रस दाखवला नाही.

अवश्य वाचा – २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता, श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांचा खळबळजनक दावा

कर्णधार म्हणून भारतीय संघाचं नेतृत्व केलेल्या २५ कसोटींपैकी सचिनने आपल्या संघाला ४ सामन्यांत विजय मिळवून दिला, उरलेल्या ९ सामन्यांमध्ये भारतीय संघ पराभूत झाला तर १२ सामने अनिर्णित राहिले. याव्यतिरीक्त ७३ वन-डे सामन्यांमध्ये सचिन भारताला फक्त २३ सामन्यांमध्ये विजय मिळवून देऊ शकला. सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर सचिनकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची संधी आली होती, मात्र यावेळी सचिनने युवा धोनीचं नाव पुढे केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 5:35 pm

Web Title: he was so involved in his own performance madan lal reveals why sachin tendulkar struggled as captain psd 91
Next Stories
1 २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता, श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांचा खळबळजनक दावा
2 रोहित आणि ‘या’ महिलेचा फोटो व्हायरल; तुम्हाला माहित्येय का कारण?
3 Video : मोहम्मद शमीने केली सरावाला सुरुवात
Just Now!
X