फुटबॉल खेळताना डोक्याचा जास्त वापर करणाऱ्या फुटबॉलपटूंच्या मेंदूला धोका पोहोचण्याची जास्त शक्यता असते, असा निष्कर्ष एका पाहणीद्वारे शास्त्रज्ञांनी काढला आहे.
फुटबॉल खेळणाऱ्या शालेय मुलींवर केलेल्या अमेरिकेतील एका पाहणीनुसार, डोक्याने वारंवार चेंडू टोलवणाऱ्या खेळाडूंच्या मेंदूवर मध्यम स्वरूपाचे आघात होत असतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
१२ वर्षांच्या फुटबॉल खेळणाऱ्या मुलींवर आणि त्याच वयाच्या फुटबॉल न खेळणाऱ्या मुलींवर हे संशोधन करण्यात आले. संगणकाद्वारे या दोन्ही गटातील मुलींच्या मानसिक जागरूकतेचा दर्जा पाहण्यासाठी एक चाचणी घेण्यात आली. त्यात फुटबॉल न खेळणाऱ्या मुली अतिशय वेगाने उत्तरे देत होत्या. त्याउलट सरावादरम्यान डोक्याने चेंडू तटवणाऱ्या मुलींकडून उत्तरे मिळण्यास विलंब होत होता. मात्र प्रदीर्घ काळ फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंच्या मेंदूत काही बदल होतात का, या निष्कर्षांवर पोहोचण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
हेडिंग कौशल्याद्वारे छाप पाडणारे इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू जेफ अ‍ॅस्टल यांचे वयाच्या ५९व्या वर्षी २००२मध्ये निधन झाले होते. त्यांचे निधन हे मेंदूवर झालेल्या आघातांमुळे झाले होते, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.