* प्रतिकूल वातावरणामुळे माघारसत्र
* फेडरर, मरेची विजयी सलामी
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा दुसरा दिवस टेनिसपटूंना नकोसा ठरला. प्रचंड उष्णता आणि आद्र्रतापूर्ण वातावरणामुळे दहापेक्षा अधिक खेळाडूंनी माघार सामन्यातून माघार घेतली. ‘का रे उन्हाळा?’ अशीच परिस्थिती कायम राहिल्यास संयोजक आणि खेळाडूंसमोरील समस्या वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान दोन वर्षांहून अधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी आतुर रॉजर फेडरर, अँडी मरे यांच्यासह सिमोन हालेप, कॅरोलिन वोझ्नियाकी, पेट्रा क्विटोव्हा यांनी विजयी आगेकूच केली.
द्वितीय मानांकित सिमोन हालेपविरुद्ध खेळताना न्यूझीलंडच्या मारिना इराकोव्हिने माघार घेतली. पुरुषांमध्ये थानसाई कोकिनाकीस, मार्कोस बघदातीस, इर्नेस्ट गुलबिस आणि अलेक्झांड्र नेडोव्येसोव्ह यांना दुखापतीमुळे आपापल्या लढती अर्धवट सोडाव्या लागल्या.
अमेरिकन खुल्या स्पर्धेची पाच जेतेपदे नावावर असलेल्या फेडररने अर्जेटिनाच्या लिओनाडरे मेयरवर ६-१, ६-२, ६-२ असा सहज विजय मिळवला. या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू होण्याचा मान मिळवण्यासाठी प्रयत्नशील फेडररने १२ बिनतोड सव्‍‌र्हिस आणि २९ विजयी फटक्यांसह वर्चस्व गाजवले. पुढच्या लढतीत फेडररची लढत बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिसशी होणार आहे.
आक्षेपार्ह शेरेबाजीप्रकरणी बंदीची शिक्षा झालेल्या निक कुर्यिगासवर अँडी मरेने मात केली. मरेही ही लढत ७-५, ६-३, ४-६, ६-१ अशी जिंकली. या विजयासह मरेने कुर्यिगासविरुद्धच्या चारही लढतींत निर्विवाद वर्चस्व राखले. २०१० पासून मरेने प्रत्येक वर्षी अमेरिकन खुल्या स्पर्धेत किमान उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. यंदाही जेतेपदाचा दावेदार असणाऱ्या मरेची दुसरी लढत फ्रान्सच्या अ‍ॅड्रियन मॅनारिओशी होणार आहे.
बरनॉर्ड टॉमिकने बोस्नियाच्या दामिर झ्यूमूरचा ५-७, ७-६ (७-४), ६-४, ६-३ असा पराभव केला. फ्रेंच खुल्या स्पर्धेचा विजेता स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने स्पेनच्या अल्बटरे रामोस व्हिनलोसला ७-५, ६-४, ७-६ (८-६) असे नमवले.
महिलांमध्ये युक्रेनच्या लेसिआ सुरेन्कोने सहाव्या मानांकित ल्युसी साफारोव्हावर ६-४, ६-१ असा विजय मिळवला. दोनच फेऱ्यांमध्ये अ‍ॅना इव्हानोव्हिक, कॅरोलिना प्लिसकोव्हा आणि कार्ला सुआरेझ नवारो यांच्यासह साफारोव्हाला गाशा गुंडाळावा लागला आहे. समंथा स्टोसूरने तिमेआ बाबोसवर ६-३, ६-४ अशी मात केली. कॅरोलिन वोझ्नियाकीने अमेरिकेच्या जेमी लोइबचा ६-२, ६-० असा धुव्वा उडवला.
पाचव्या मानांकित पेट्रा क्विटोव्हाने जर्मनीच्या लॉरा सिगमंडचा ६-१, ६-१ असा पराभव केला. व्हिक्टोरिया अझारेन्काने चेक प्रजासत्ताकच्या ल्युसी राडेकावर ६-१, ६-२ अशी मात केली. स्पेनच्या गार्बिन म्युगुरुझाने जर्मनीच्या कॅरिना विथोइफ्टचा ६-२, ६-४ असा पराभव केला.