इंग्लंडमधील आरोग्य यंत्रणेच्या करोनाविरुद्ध चालू असलेल्या लढय़ात इंग्लंडची कर्णधार हिदर नाइट हीसुद्धा सहभागी झाली आहे. याकरिता ती राष्ट्रीय आरोग्य सेवेत (एनएचएस) स्वयंसेवक म्हणून सामील झाली आहे.

इंग्लंडचे सात कसोटी, १०१ एकदिवसीय आणि ७४ ट्वेन्टी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व करणारी २९ वर्षीय हिदर राष्ट्रीय आरोग्य सेवेद्वारे औषध पोहोचवणे आणि जागृती निर्माण करणे हे कार्य करीत आहे. इंग्लंडमध्ये करोना विषाणू संसर्गामुळे १४५४३ जण बाधित झाले आहेत. बुधवारी राष्ट्रीय आरोग्य सेवेने नागरिकांना सामील होण्याचे आवाहन केल्यानंतर १० हजारांहून अधिक जण यात दाखल झाले आहेत.

हिदरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने महिन्याच्या पूर्वाधात ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती; परंतु पावसामुळे भारताला विजयी घोषित करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर काही दिवसांतच करोनाचे आव्हान इंग्लंडमध्येही तीव्रतेने भासू लागले आहे.

‘‘माझा भाऊ आणि त्याची जोडीदार डॉक्टर आहेत. याचप्रमाणे माझे काही मित्रसुद्धा राष्ट्रीय आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे हे काम किती कठीण असते, याची मला जाणीव होती. त्यामुळेच मलासुद्धा या कठीण काळात आरोग्य सेवा करायची प्रेरणा मिळाली,’’ असे हिदरने सांगितले.

करोनामुळे क्रिकेट स्थगित झाले असल्याने माझ्याकडे असलेला बराचसा मोकळा वेळ इतरांच्या मदतीसाठी सत्कारणी लावण्याची माझी इच्छा होती. त्याच इराद्याने मी राष्ट्रीय आरोग्य सेवेत स्वयंसेवक झाली आहे.

-हिदर नाइट, इंग्लंडची क्रिकेटपटू