आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक  स्पध्रेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची भारताच्या हिना सिंधूची संधी अगदी थोडक्यात हुकली. हिनाने ४०० पैकी ३८५ गुणांची कमाई करत पाच नेमबाजांसह बरोबरी साधली. त्यामुळे प्रत्येकी ४० शॉट नेमबाजांना देण्यात आले. मात्र, यात हिनाने अगदी थोडय़ा गुणांच्या फरकाने संधी गमावली आणि उर्वरित चार नेमबाजांना अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. हिनासह १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सहभागी झालेल्या भारताच्या श्वेता चौधरीला ३४व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अन्नू राज सिंग ५५व्या स्थानावर गेल्याने तिचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
लज्जा गोस्वामी, एलिजाबेथ सुसान कोशी आणि अंजली भागवत यांनाही ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराच्या पात्रता फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. ५७८ गुणांसह लज्जाला १६व्या, ५७६ गुणांसह एलिजाबेथला २०व्या आणि ५६६ गुणांसह अंजलीला ५७व्या स्थानावर समाधान मानावे लागले. याच प्रकारात क्रोएशियाच्या पेजसिस स्नेजेंझाना हिने बाजी मारून दुसरे सुवर्णपदक जिंकले.