२०२२च्या राष्ट्रकुलमधून नेमबाजी खेळ वगळल्याप्रकरणी हीना सिधूची साद

नवी दिल्ली : २०२२च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी हा खेळ वगळण्यात आला असून त्यावर बऱ्याच देशांनी टीका केली आहे. आता खेळाडूही या बाबतीत आवाज उठवत आहेत. या प्रकरणी भारताने पुढाकार घेण्याची गरज आहे, अशी साद भारताची आघाडीची पिस्तूल नेमबाज हीना सिधू हिने घातली आहे.

बर्मिगहॅम येथे २०२२मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी खेळाचा समावेश करण्यात आला नाही तर संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा इशारा भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) गेल्या महिन्यात दिला होता. गेल्या वर्षी भारतीय नेमबाजी असोसिएशननेही तशीच हाक दिली होती. या स्पर्धेतून माघार घेणे, हाच एकमेव पर्याय आहे का, असे विचारल्यावर हीना म्हणाली, ‘‘याआधीही तसे घडले आहे. अनेकदा भारताने माघार घेतली आहे. पण भारत हा मोठा देश असून याविरोधात आवाज उठवायलाच हवा. अन्य खेळातील स्पर्धकांना याचा फटका बसणार नाही. त्यांनी स्पर्धेत सहभागी व्हायला हवे, पण त्याच वेळी भारताने नेमबाजी बंदीप्रकरणी आवाज उठवायला हवा.’’

संयोजन समितीच्या या निर्णयामुळे नेमबाजी या खेळाकडे वळण्याचे प्रमाण कमी होईल, याविषयी हीनाने असहमती दर्शवली. ती म्हणाली, ‘‘नेमबाजीकडे सध्या मोठय़ा संख्येने युवा पिढी आकर्षित होत आहे. संयोजकांनी दिलेले कारण ते नेमबाजीच्या परंपरेला न शोभणारे आहे.

शूटिंग रेंजची समस्या भेडसावणे, हे उत्तरही आम्हाला पटत नाही. संयोजकांनी उच्च दर्जाची रेंज उभारायला हवी.’’

‘‘नेमबाजीचा विचार न करता संयोजकांनी महिला ट्वेन्टी-२० क्रिकेटचा समावेश केला आहे. लैंगिक समानता ध्यानात ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मग पुरुष क्रिकेटचा समावेश का करण्यात आला नाही? आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ, भारतीय नेमबाजी महासंघ आणि ‘आयओए’ने नेमबाजी हा खेळ जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, पण त्याचा आता हा निर्णय बदलेल, असे वाटत नाही.’’