अगदी भिन्न परिस्थितींमध्ये वाढलेल्या ‘त्या’ असामान्य चौघी. एक अत्यंत गरीब घरातील. दुसरी निम्न मध्यमवर्गीय, तिसरी मध्यमवर्गीय आणि चौथी उच्चभ्रू घरातील. चौघींचे क्षेत्र आणि त्यांच्या प्रेरणेची कारणेदेखील विभिन्न. पण आपापल्या खेळात सर्वोच्च स्थानी पोहोचण्यामागे एकच समान सूत्र, ते म्हणजे जिद्द. खेलरत्न पुरस्काराने सन्मानित वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू, आंतरराष्ट्रीय नेमबाज हिना सिधू, भारताच्या हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल आणि अ‍ॅथलेटिक्समधील ‘नवतारका’ हिमा दास या चार खेळाडूंनी एका सोहळ्यात त्यांच्या यशाची गुरुकिल्ली उलगडली. आम्ही खेळताना केवळ वर्तमानाचे भान ठेवतो, त्या क्षणी बाकी कशाचाच विचार मनात येऊ देत नाही, त्यामुळेच इतके यश मिळणे शक्य असल्याचा सूर या खेळाडूंनी व्यक्त केला.

‘एडलवाइज’ या अर्थ क्षेत्रातील कार्यरत आस्थापनेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात या चौघींनी त्यांच्या जीवनातील प्रेरणास्थाने आणि कारकीर्दीच्या आरंभीच्या काळातील संघर्षांचा पटच उलगडला.

‘अवजड वस्तू उचलायचा’ खेळ खेळायचाय!

‘‘माझ्या घरात सगळेच खेळाडू होते. अगदी आई, वडीलदेखील क्रीडाप्रेमी. भावंडे सगळी फुटबॉल खेळायची. मग मीसुद्धा त्यांच्याबरोबर खेळायचे. पण तो खेळ तितकासा आवडायचा नाही. एके दिवशी वर्तमानपत्रात कुंजुराणी यांच्याबद्दल वाचले आणि मला वाटू लागले की आपणदेखील हा खेळ खेळावा. मग मी माझ्या आईला म्हणाले, मलादेखील हा खेळ खेळायचाय. मला त्याचे नावदेखील नीटसे सांगता येत नव्हते. मग मी सांगितले ‘अवजड वस्तू उचलायचा’. प्रारंभी ती नाही म्हणाली, पण मी हट्टच केल्यावर ती हो म्हणाली. बस तिथून माझा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झालाय. त्यानंतर मी माझ्या वजनी गटातील विश्वविजेतेपददेखील जिंकले. तिथून मग मी मागे वळून बघितले नाही,’’ असे मीराबाई चानूने सांगितले.

बहोत धुलाई खाया!

‘‘मी एकत्र कुटुंबात वाढले. त्यामुळे घरातील १७ सदस्य आणि काकांची मुले यातच माझे बालपण गेले. त्यांच्यासारखीच दंगामस्ती, खेळणे, बागडणे असे सर्व प्रकार केले. त्यामुळे घरी ‘बहोत धुलाई खाया’. पुढे शाळेत आणि तिथून पुढचा प्रवास सुरू झाला. मी फिनलंडमध्ये खेळायला जातानासुद्धा घरच्यांना विशेष सांगितले नव्हते. एखादी नेहमीचीच स्पर्धा असल्यासारखे त्यांना वाटले. त्यामुळे स्पर्धा जिंकून मी घरी वडिलांना फोन केला, तर ते म्हणाले, ‘अभी जो हुआ वो ठिक है, बहोत रात हो गई है, सुबह देख लेंगे’. दुसऱ्या दिवशी सगळी प्रसारमाध्यमे समोर आल्यावर त्यांना माझ्या विजयाचे महत्त्व कळले,’’ अशी आठवण हिमा दासने सांगितली.

वडिलांचे स्वप्न साकारले!

‘‘माझ्या वडिलांना नेहमी वाटायचे, आपल्या एका तरी मुलाने भारतासाठी खेळावे. साहजिकच भावाच्या क्रिकेटकडे त्यांचे अधिक लक्ष होते आणि मी अभ्यास करायचे. मी हुशार असल्याने मला वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळाला. मात्र अभ्यासाचा दबाव खूपच वाटायचा. तसेच वडिलांचे लक्ष आकर्षित करून घ्यायचे हादेखील उद्देश होता. दरम्यान, माझ्या काकांचे शस्त्रास्त्रांचे दुकान होते. त्यातील बंदुका मला आकर्षित करायच्या. पण खेळ म्हणून मी कधीच त्यांचा विचार केला नव्हता. नंतर एकेदिवशी या खेळाला प्रारंभ केला आणि माझे नेमबाजीशी नाते जुळले. त्यानंतर एकेक टप्पा गाठत इतके मोठे यश मिळवू शकले,’’ असे हिना सिधूने सांगितले.

खेळामुळे कुटुंबाला चांगले दिवस दाखवू शकले!

‘माझे बालपण अत्यंत गरिबीत गेले. वडील रेडागाडी ओढायचे. त्यामुळे कुटुंबाला चांगले दिवस दाखवायचे असे लहानपणापासून वाटायचे. पावसाळ्यात तर घरात पाणीच पाणी साठायचे. त्यामुळे पावसाळा नको वाटायचा. कुटुंबासाठी चांगले घर असायला हवे, असे नेहमी वाटायचे. मग काय करता येईल, त्याचा विचार करीत होते. त्या वेळी आपण जर चांगले खेळलो तर आपल्या कुटुंबाला आपण चांगले दिवस दाखवू शकतो असे समजले. त्यानंतर हॉकीची स्टिक हातात आली आणि पूर्ण आयुष्य बदलून गेले,’’ असे राणी रामपालने सांगितले.