भारताचे मुख्य पिस्तूल प्रशिक्षक पॅव्हेल स्मिर्नोव्ह अकार्यक्षम असून, त्यांना खेळाच्या तांत्रिक माहितीचा अभाव आहे, अशा शब्दांत आघाडीची नेमबाज हीना सिधूने त्यांच्यावर टीका केली आहे.

‘‘प्रशिक्षक स्मिर्नोव्ह यांनी माझ्या प्रश्नांची कधीच उत्तरे दिली नाहीत. कारण त्यांना खेळाची कोणतीही तांत्रिक माहिती नाही. हे फक्त माझेच मत नाही, तर जितू रायनेही हेच मत माझ्याकडे प्रकट केले आहे,’’ असे सिधूने सांगितले.

‘‘माझे आणि जितूचेच नव्हे, तर बहुतांशी नेमबाजांचे हेच म्हणणे आहे की, प्रशिक्षक हे तांत्रिकदृष्टय़ा कमजोर आहेत. मला त्यांच्यासारख्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेणे कधीच आवडणार नाही. फक्त संघटनेच्या निर्देशामुळे मी त्यांच्यासोबत सराव केला. परंतु हे कठीण असल्याचे मला लक्षात आले. त्यांच्या कार्यक्षमतेविषयीच मला शंका आहे,’’ असे हीनाने सांगितले.

हीनाचा पती रौनक पंडित हाच बहुतांशी वेळा तिला प्रशिक्षक असतो. गबाला येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पध्रेत हीनाने जितूसोबत मिश्र सांघिक गटातील १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला सुवर्णपदक जिंकून दिले.