आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचे सह-मालक राज कुंद्रा यांनी लोढा समितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. माझ्याविरोधात कोणताही पुरावा नसताना मला दोषी ठरविण्यात आल्याचा दावा राज कुंद्रा यांनी केला आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीने राज कुंद्रा आणि गुरूनाथ मयप्पन यांना आजीवन बंदीची शिक्षा सुनावली तर, चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांना दोन वर्षांसाठी आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना राज कुंद्रा म्हणाले की, माझ्या प्रामाणिकपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आल्याने हा दिवस माझ्यासाठी अतिशय दु:खद आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुद्गल समितीला मी अगदी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत सर्वेतोपरी मदत केली. माझ्याविरोधात कोणताही पुरावा नसूनही मला दोषी ठरविण्यात आले. यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही.
दरम्यान, न्यायालयाच्या निकालाची प्रत अद्याप देखील माझ्यापर्यंत पोहोचली नसल्याचेही कुंद्रा यांनी यावेळी सांगितले आहे. एवढेच नव्हे, तर दिल्ली आणि राजस्थान येथील पोलिसांना माझ्यावर कारवाई करता येईल असे कोणतेही पुरावे आढळून आले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाचा आणि आपल्या न्यायव्यवस्थेचा मी नेहमीच आदर करीत आलो आहे. पण या प्रकरणाच्या बाबतीत मी चुकीचा असल्याचे मला वाटत नाही. त्यामुळे माझ्याविरोधात सापडलेल्या पुराव्यांची माहिती देण्याची विनंती न्यायालयाला करीत आहे. जेणेकरून कोणत्या मुद्द्यांना अनुसरून मला दोषी ठरविण्यात आले आहे याची माहिती मिळू शकेल, असेही राज कुंद्रा पुढे म्हणाले.