रोमानियाच्या दुसऱ्या मानांकित सिमोना हॅलेप आणि इटलीच्या फ्लेव्हिडा पेन्नेट्टा यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेच्या महिला गटाची उपांत्य फेरी गाठली आहे. हॅलेप आणि पेन्नेट्टा यांनी अनुक्रमे व्हिक्टोरिया अझारेंका आणि पेट्रा क्विटोव्हा या दिग्गजांना माघारी धाडले.

हॅलेपने दोन वेळा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेत बाजी मारणाऱ्या अझारेंकावर ६-३, ४-६, ६-४ असा विजय मिळवत प्रथमच या स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. ‘‘ही लढत जिंकण्यासाठी ताकद कुठून आली, हेच मला कळले नाही. पहिल्यांदा उपांत्य फेरीत धडक मारण्याचा आनंद होत आहे,’’ असे हॅलेप म्हणाली.

पेन्नेट्टाने दोनवेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकणाऱ्या झेक प्रजासत्ताकच्या क्विटोव्हावर ४-६, ६-४, ६-२ असा विजय मिळवला.