लोखंडाचही सोनं करणाऱ्या परिस या काल्पनिक दगडाबद्दल आतापर्यंत आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. असा दगड प्रत्यक्ष आयुष्यात नसला तरीही पाकिस्तानला चॅम्पियन्स करंडक जिंकून देण्यासाठी असाच एक ‘परिस’ सापडला आहे. या परिसाचं नाव आहे झैनाब अब्बास.

पाकिस्तानी टीव्ही चॅनलसाठी काम करणारी झैनाब अब्बास सध्या चॅम्पियन्स करंडक कव्हर करण्यासाठी इंग्लंडला गेली आहे. मात्र आपल्या वार्तांकनापेक्षा एका वेगळ्याच कारणासाठी ती सोशल मीडियावर ट्रेंडिंग होताना दिसतेय. आश्चर्यकारकरित्या झैनाबने आतापर्यंत ज्या ज्या खेळाडूंसोबत सेल्फी काढले ते खेळाडू एकतर भोपळा न फोडता माघारी परतले किंवा त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या खेळाडूंसोबत झैनाबने सेल्फी काढला तो संघ सामना हरलेला आहे.

पाकिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातील एजबस्टन येथील सामन्याच्या एक दिवसआधी झैनाबने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हीलियर्ससोबत सेल्फी काढला आणि दुसऱ्याच दिवशी डिव्हिलियर्स पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाला. हा सामना देखील पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकला होता.

पाकिस्तानवर मात करुन भारताने या सामन्याची सुरुवात मोठ्या दिमाखात केली. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी झैनाबने विराट कोहलीसोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि नेमका विराट कोहली भोपळा न फोडता माघारी परतला. या सामन्यात भारताने ३०० हून अधिक धावसंख्येचा डोंगर उभारला होता, मात्र गोलंदाजांच्या निष्प्रभ कामगिरीमुळे भारताने हा सामना गमावला होता.

यानंतर वेळ होती श्रीलंकन कर्णधार अँजलो मॅथ्यूजची. १२ जून रोजी श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कार्डीफच्या मैदानात सामना खेळवला गेला. या सामन्यात मॅथ्यूज अगदी शून्यावर बाद झाला नसला तरीही त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं नाही, आणि श्रीलंकने सामना गमावला.

विराट, एबी आणि मॅथ्यूजप्रमाणे इंग्लंडचा जो रुट देखील झैनाबचा शिकार ठरलाय. उपांत्य सामन्याआधी रुटनेही झैनाबसोबत सेल्फी काढला, आणि या सामन्याचा निकाल काय लागला हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. रुटने उपांत्य सामन्यात ४६ धावांची खेळी केली मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मात्र तो अपयशी ठरला.

या गोष्टीत झैनाबचा कोणताही दोष नसला तरीही सोशल मीडियावर पाकिस्तानी चाहत्यांकडून झैनाबला भारतीय खेळाडूंसोबत अधिकाधीक सेल्फी काढण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे सामना जिंकायचा असेल तर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या या परिसस्पर्शापासून लांबच राहिलेलं बरं.