आयपीएल आणि वाद हे समिकरण काही जुनं नाही. याच वादात काल आणखीन एका वादाची भर पडली. आयपीएलच्या बाराव्या हंगामात जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात काल रात्री रंगलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपरकिंग्सच्या सामन्यादरम्यान पंचांनी दिलेल्या नो बॉलच्या एका निर्णयावरुन चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी चांगलाच संतापला. रागाच्या भरात थेट डगाऊटमधून मैदानात येत त्याने पंचाशी वाद घातला. खेळ भावनेला धक्का पोहचवणाऱ्या धोनीच्या या वर्तवणूकीवरुन नेटकऱ्यांनी त्याच्यावर टिकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे धोनीच्या पाठीराख्यांची संख्याही बरीच आहे. त्यामुळे धोनीच्या या वादग्रस्त वागण्यावरुन समर्थक विरुद्ध टिकाकार असा समाना सोशल नेटवर्किंगवर रंगलेला दिसत आहे. मात्र यंदाच्या हंगामामध्ये आयपीएलमध्ये वाद होण्याची ही काही पाहिलीच वेळ नाही. आयपीएल अद्याप अर्धेही संपले नसले तरी काही वाद चांगलेच चर्चेत राहिले आहेत. पाहुयात आयपीएलच्या पहिल्या २५ सामन्यांमध्ये झालेले पाच वाद…

१)
अश्विनने बटलरला मंकड पद्धतीने बाद केले

आयपीएलच्या यंदाच्या सत्रातील पहिला सामना पंजाबने १४ धावांनी जिंकला. मात्र या सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला तो म्हणजे सलामीवीर जोस बटलरची विकेट. मंकड पद्धतीने पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने बटलरला बाद केले. त्यामुळे अश्विनच्या खिळाडूवृत्तीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेकांना अश्विनचे हे वागणे पटलेले नाही. तर दुसरीकडे राहुल द्रविडसारख्या दिग्गजांनी नियमांमध्ये असल्यास मंकड पद्धतीने एखाद्याला बाद करण्यात चुकीचे काही नसल्याचे मत व्यक्त केले. तरी हे असे वागणे खिळाडूवृत्तीला शोभणारे नाही असं माझं वैयक्तिक मत असल्याचे याप्रकरणावर बोलताना द्रविडने म्हटले होते.

नक्की वाचा
>
अश्विनने घेतला टिपूचा बदला, पाहा व्हायरल मिम्स
>
Video : याआधीही अश्विननं केलेलं मंकडिंग; सचिन व सेहवागनं दिला नव्हता थारा
>
अश्विनची कृती ही खिलाडूवृत्तीची नव्हती!; ‘मंकडिंग’बाबत ‘एमसीसी’चे घूमजाव

२)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई सामन्यातील मलिंगाचा तो नो बॉल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अगदी शेवटच्या चेंडूवर ६ धावांनी विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज असताना बंगळुरुला केवळ एकच धाव घेता आली. सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मलिंगाने टाकलेला सामन्यातील शेवटचा चेंडू नो बॉल असल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या प्रकारावरून क्रिकेट विश्वात तीव्र पडसाद उमटले. दिग्गज क्रिकेटपटूंनी पंचांच्या हलगर्जीपणावर सडकून टीका केली.

नक्की वाचा
>
‘त्या’ नो बॉल वरून क्रिकेट विश्व खवळले, दिग्गजांनी उठवली टीकेची झोड
>
‘पंचांनाच द्या सामनावीर पुरस्कार’, नो बॉलवरुन नेटकऱ्यांची तुफान फटकेबाजी
>
पंच एस.रवी आणि नंदन यांच्यावर कारवाईची शक्यता कमीच

३)
बॉल लागूनही बेल्स पडेनात

यंदाच्या आयपीएलमध्ये आणखीन एक वादग्रस्त विषय ठरत आहे तो म्हणजे स्टंपला चेंडू लागूनही बेल्स न पडणे. स्टंपला चेंडू लागून बेल्स चमकतातही पण पडत नाही. जोपर्यंत बेल्स पडत नाही तोपर्यंत फलंदाजाला बाद घोषित करता येत नाही. त्यामुळेच केवळ बेल्समधील लाइट लागला तरी फलंदाजाला बाद दिले जात नाही. आठ एप्रिल रोजी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यामध्येही असाच प्रकार घडला. राजस्थानच्या धवल कुलकर्णीने ख्रिस लिनला तिसऱ्या षटकामध्ये टाकलेला चेंडू बॅटला लागून बेल्सला लागला. बेल्सचा लाईटदेखील पेटला. पण नेमकी बेल्स पडलीच नाही, त्यामुळे स्टंपला चेंडू लागूनही लिन नाबाद राहिला. असाच प्रकार यंदाच्या हंगामात दोन वेळा धोनीच्या बाबतीत घडला आहे. ३१ मार्च रोजी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात जोफ्रा आर्चर टाकत असलेल्या सहाव्या षटकादरम्यान, एका बॉलने धोनीला पुरत चकवलं. यावेळी बॉल स्टम्पला जाऊल लागलाही, मात्र बेल्स न पडल्यामुळे धोनी बाद होता होता वाचला. या प्रकारानंतर राजस्थानच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरही काहीकाळ हास्य पसरलं होतं. असाच प्रकार पुन्हा सहा एप्रिल रोजी झालेल्या चेन्नईविरुद्ध पंजाब सामन्यात घडला. यावेळी फरक इतकाच होता की धोनी स्टंपमागे होता. चेन्नईच्या गोलंदाजीदरम्यान, रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्यासाठी राहुल पुढे गेला, परंतु धोनीने चपळाईने चेंडूकडे धाव घेतली. त्याने नेहमीच्या शैलीत चेंडू मागे न वळताच चेंडू थेट यष्टिंवर मारला. पण, बेल्स न पडल्याने राहुल बाद ठरला नाही.

नक्की वाचा
>
Video : स्टंपला चेंडू लागूनही बेल्स पडल्याच नाहीत; गोलंदाज हैराण
>
धोनीचं दैव बलवत्तर, बॉल स्टम्पला लागूनही Not Out
>
….आणि धोनीची जादू मैदानात चाललीच नाही

४)
चेन्नईची खेळपट्टी

यंदाच्या महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सचे होम ग्राऊण्ड असणाऱ्या चेन्नास्वामी मैदानावरील खेळपट्टीही वादाचा विषय ठरत आहे. या खेळपट्टीवर जास्त धावा करणे शक्य नसल्याचे मत स्वत: धोनीने व्यक्त केले आहे. या मैदानात खेळताना सलग चार सामने जिंकल्यानंतरही धोनी खेळपट्टीच्या दर्जाबद्दल नाराज असल्याचे दिसते. मंगळवारी कोलकात्याविरुद्ध या मैदानावर विजय मिळवल्यानंतर बोलताना धोनीने खेळपट्टीवर असलेली नाराजी बोलून दाखवली. सामन्यानंतर धोनी म्हणाला, ‘ या खेळपट्टीवर आता आणखी खेळायला नको. या खेळपट्टीमुळे मोठी धावसंख्या करणे कठीण आहे. ब्राव्होच्या दुखापतीमुळे संघातील संतुलन बिघडले आहे. आम्हाला बऱ्याच समस्येला सामोरं जावं लागतेय. खेळपट्टी संथ असतानाही आम्ही विजय मिळवला.’ अनेकदा समालोचकही या खेळपट्टीसंदर्भात टिका करताना ऐकायला मिळतात.

नक्की वाचा
>
CSK vs KKR : सलग चौथ्या विजयानंतरही धोनी खेळपट्टीवर नाराज

५)
धोनीने मैदानात येऊन घातला राडा

महेंद्रसिंह धोनी हा सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांना ‘कॅप्टन कूल’ या नावाने परिचीत आहे. मात्र आयपीएलच्या बाराव्या हंगामात जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात धोनीचं एक वेगळचं रुप त्याच्या चाहत्यांना पहायला मिळालं. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १८ धावांची आवश्यकता असताना, मधल्या चेंडूवर पंचांनी नो-बॉलचा इशारा केला. मात्र यानंतर दुसरे पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी तो चेंडू नो-बॉल नसल्याचं जाहीर केलं. यावेळी मैदानात दोन्ही पंचांमध्ये प्रचंड सावळागोंधळ पहायला मिळाला. हा सर्व प्रकार पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या धोनीचा सर्व संयम गळून पडला आणि त्याने मैदानात येऊन पंचांसोबत राडा केला. पंच उल्हास गंधे यांनी बेन स्टोक्सने टाकलेला फुलटॉस चेंडू नो-बॉल असल्याचं घोषित केलं. मात्र दुसरे पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी हा चेंडू नो-बॉल नसल्याचं म्हटलं. मात्र उल्हास गंधे यांनी नो-बॉलचा दिलेला इशारा हा सर्वांच्या नजरेस पडला होता, तरीही पंचांनी आपला हा निर्णय मागे घेतला. नेमक्या याच मुद्द्यावर आक्षेप घेत धोनीने मैदानात येऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचा हा अवतार त्याच्या चाहत्यांसाठी नवीनच होता.

नक्की वाचा
>
पंचांनी नो-बॉलचा निर्णय रद्द केला, धोनीने मैदानात राडा केला
>
मैदानात पंचांबरोबर वाद घातल्याने धोनी अडचणीत, आयपीएलने केली ही कारवाई
>
धोनी चुकला का?, तुम्हाला काय वाटते?; नोंदवा तुमचे मत

आत्तापर्यंत आयपीएलचे ५६ पैकी २५ सामने झाले असून उर्वरित हंगामातही असे वादग्रस्त निर्णय पहायला मिळू शकतील.