मस्कत येथे सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने जपानचा ९- ० ने धुव्वा उडवत विजयाचा धडाका सुरुच ठेवला आहे. भारतातर्फे हरमनप्रित सिंग, ललित उपाध्याय आणि मनदिप सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत रविवारी भारत आणि जपान यांच्यात सामना रंगला. या चषकात भारताने पहिल्या सामन्यात ओमानचा ११- ० ने धुव्वा उडवला होता. तर शनिवारी पाकिस्तानवर ३- १ ने मात केली होती. त्यामुळे रविवारी जपानवर मात करुन भारत विजयाचा धडाका सुरु ठेवणार का, याकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष होते. भारतीय संघाने सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले.

चौथ्या मिनिटाला ललित उपाध्यायने गोल करुन संघाला आघाडी मिळवून दिली.यानंतर गुरजतने आठव्या मिनिटाला गोल केला. त्यांच्या पाठोपाठ हरमनप्रितने १७ व्या आणि २१ व्या मिनिटाला गोल करुन संघाला ४- ०अशी विजयी आघाडी मिळवली. यानंतर भारताने जपानला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही.

जपानला सामन्यात एकही गोल करता आला नाही. तर भारताने तब्बल ९ गोल मारत जपानचा धुव्वा उडवला. भारतातर्फे हरमनप्रित, मनदिप आणि ललित या तिघांनी प्रत्येकी दोन गोल केले. तर गुरजत, आकाशदीप आणि कोठजित या तिघांनी प्रत्येकी एक गोल केला.