पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्याबाबतचा दुबळेपणा तसेच विस्कळीत चाली, यामुळेच भारताला जागतिक हॉकी लीगमधील पहिल्या साखळी लढतीत पराभवास सामोरे जावे लागले. अ‍ॅडम डिक्सनने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर इंग्लंडने भारतास २-० असे हरविले.
मेजर ध्यानचंद स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत घरच्या मैदानावर भारतीय संघ चांगली कामगिरी करील अशी अपेक्षा होती. मात्र भारतास अपेक्षेइतका प्रभाव दाखविता आला नाही. चार पेनल्टी कॉर्नर मिळूनही त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. इंग्लंडने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली होती. डिक्सन याने पूर्वार्धात २८ व्या मिनिटाला, तर उत्तरार्धात सामन्याच्या ४५ व्या मिनिटाला गोल केले. त्याने हे दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरद्वारा केले.
भारतीय खेळाडू पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्यात अजूनही कमकुवत आहेत याचा प्रत्यय येथे आला. पूर्वार्धात त्यांना १५ व्या व १६ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र या सुवर्णसंधींचा लाभ त्यांना घेता आला नाही. इंग्लंडला २१ व्या व २३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र भारतीय गोलरक्षक श्रीजेशने या चाली शिताफीने रोखल्या. २८ व्या मिनिटाला त्यांच्या डिक्सन याने पेनल्टी कॉर्नरद्वारा सुरेख गोल केला.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी जोरदार चाली केल्या. ४५ व्या मिनिटाला इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा लाभ घेत डिक्सनने स्वत:चा व संघाचा दुसरा गोल केला. पुढच्याच मिनिटाला भारताने पेनल्टी कॉर्नर वाया घालविला. ५९ व्या मिनिटाला भारतास पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर रुपींदरसिंग याने गोल मारला, मात्र त्याबद्दल इंग्लंडच्या खेळाडूंनी आक्षेप घेत तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. हा कॉर्नर घेताना बीरेन लाक्रा याने नियमानुसार चेंडू थांबविला नाही, हा त्यांचा आक्षेप पंचांनी मान्य केला व भारताचा गोल अमान्य केला.