बेल्जियमवर ३-१ असा दणदणीत विजय; उपांत्य फेरीत पोर्तुगालशी सामना

स्वीडनमध्ये १९५८ साली पार पडलेल्या विश्वचषक स्पध्रेत उपांत्यपूर्व फेरीत धडक, ही एकमेव ओळख गेली ५८ वष्रे जपणाऱ्या वेल्सने शुक्रवारी स्वप्नवत वाटचालीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आणि स्वत:ची नवीन ओळख निर्माण केली. युरो चषक स्पध्रेच्या उपांत्यपूर्व लढतीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमला  वेल्सने ३-१ असे नमवून उपांत्य फेरीत धडक मारली. ५८ वर्षांनंतर पहिल्यांदा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पध्रेसाठी पात्र ठरलेल्या या संघाने उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. अ‍ॅश्ले विलियम्स, हॅल रॉबसन-कानू आणि सॅम व्होक्स् यांनी प्रत्येकी एक गोल करून वेल्सला विजय मिळवून दिला.

उपांत्य फेरीत वेल्सला बलाढय़ पोर्तुगालचे आव्हान पेलावे लागणार आहे. या निमित्ताने रिअल माद्रिद क्लबमधील सहकारी ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि गॅरेथ वेल्स यांच्यातही चढाओढ पाहायला मिळणार आहे. बेल्जियमच्या सीमेपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या पिएरे मौरॉय स्टेडियमवर आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी बेल्जियम चाहते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यात १३व्या मिनिटाला रॅडजा नैनगोलनने अप्रतिम गोल करत बेल्जियमला १-० अशी आघाडी मिळवून दिली आणि चाहत्यांच्या जल्लोषाला उधाण आले. ईडन हजार्डने दिलेल्या पासचा अचूक अंदाज घेत रॅडजाने अगदी चतुराईने गोल केला. मात्र, ३१व्या मिनिटाला विलियम्सने वेल्सला बरोबरी मिळवून दिली.

पहिल्या सत्रात १-१ अशा बरोबरी झाल्यामुळे दुसऱ्या सत्रात चुरस अपेक्षित होती. मात्र, वेल्सने आक्रमणाची धार तीव्र करताना बेल्जियमचा बचाव निष्प्रभ केला. मध्यंतरानंतर दहाव्या मिनिटाला कानूने गोल करत वेल्सला २-१ अशा विजयी आघाडीवर आणले. त्यानंतर बेल्जियमकडून गोल करण्याचे अनेक प्रयत्न झाले. ४५, ९३६ प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक संख्येने उपस्थित असलेल्या बेल्जियमच्या चाहत्यांमध्ये स्मशानमय शांतता पसरली. सामन्याच्या अगदी अखेरच्या क्षणाला व्होक्स्ने हेडरद्वारे गोल करून वेल्सच्या विजयावर ३-१ असे शिक्कामोर्तब केले.

मोठी स्वप्ने पाहायला घाबरू नका, कारण आम्ही आज जिथे आहोत त्यापासून चार वर्षांपूर्वी आम्ही दूर होतो. तुम्ही प्रयत्नात कुठे कमी पडत नसाल, तर तुम्हाला स्वप्नांबद्दल आणि पराभवाबद्दल भीती बाळगायला नको. स्वप्ने चांगली असतात आणि मी त्याचा आनंद लुटतो.

– ख्रिस कोलमन, वेल्सचे प्रशिक्षक

 

बेन डेव्हिस, अ‍ॅरोन रॅम्से पुढील सामन्याला मुकणार

बेल्जियमविरुद्धच्या लढतीत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अ‍ॅरोन रॅम्से आणि बेन डेव्हिस यांना उपांत्य सामन्याला मुकावे लागणार आहे.

०२ : युरो चषक स्पध्रेत बेल्जियमविरुद्ध हेडरद्वारे दोन गोल करणारा वेल्स हा एकमेव संघ आहे.

१९९२ : युरो चषक स्पध्रेत पदार्पणातच उपांत्य फेरीत प्रवेश करणारा वेल्स हा स्विडननंतरचा (१९९२) पहिला संघ आहे.

०३ : बेल्जियमने युरो चषक स्पध्रेत १९८४ (वि. डेनमार्क) नंतर पहिल्यांदा प्रतिस्पर्धी संघाकडून ३ गोल स्वीकारले आहेत.

०५ : अ‍ॅरोन रॅम्सेचा युरो स्पध्रेत एकूण पाच गोलमध्ये सहभाग आहे. यापैकी एक गोल त्याने केला असून चार गोलमध्ये सहकार्य केले. २००४ साली इंग्लंडच्या वेन रूनीने अशी कामगिरी केली होती.

१९९२ : युरो चषक स्पध्रेत पदार्पणातच उपांत्य फेरीत प्रवेश करणारा वेल्स हा स्विडननंतरचा (१९९२) पहिला संघ आहे.