दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्शेल गिब्सने काश्मीर प्रीमियर लीग संदर्भात एक मोठे विधान केले आहे. काश्मीर प्रीमियर लीगमध्ये सहभागी न होण्यासाठी भारतीय नियामक क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) दबाव आणत असल्याचा आरोप गिब्जने केला आहे. त्याने ट्विटरवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.

गिब्ज म्हणाला, ”बीसीसीआय अशा गोष्टी करत आहे, ज्याची अजिबात गरज नाही, जेणेकरून त्यांचा राजकीय अजेंडा पाकिस्तानसोबत राहील आणि मला काश्मीर प्रीमियर लीगमध्ये खेळण्यापासून रोखता येईल. त्याचबरोबर ते मला धमकी देत ​​आहेत, की ते मला क्रिकेटशी संबंधित कोणत्याही कामासाठी भारतात येऊ देणार नाहीत. हे अगदी चुकीचे आहे.”

 

काश्मीर प्रीमियर लीगचा पहिला हंगाम पुढील महिन्यात आयोजित केला जाईल. हर्शेल गिब्स, तिलकरत्ने दिलशान, मॉन्टी पानेसर सारखे मोठे क्रिकेटपटू देखील या लीगमध्ये दिसतील. ओव्हरसीज वॉरियर्स, मुझफ्फराबाद टायगर्स, रावलकोट हॉक्स, बाग स्टॅलियन, मीरपूर रॉयल्स आणि कोटली लायन्स असे सहा संघ लीगमध्ये सहभागी होत आहेत.

हेही वाचा – Tokyo 2020 : सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये सिंधूचा पराभव

या संघांचे नेतृत्व इमाद वसीम, मोहम्मद हाफिज, शाहिद आफ्रिदी, शादाब खान, शोएब मलिक आणि कामरान अकमल हे खेळाडू करणार आहेत. प्रत्येक संघात पाकव्याप्त काश्मीरचे पाच क्रिकेटपटू असतील. काश्मीर प्रीमियर लीगचा हा हंगाम यावर्षी मे महिन्यात आयोजित केला जाणार होता, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तो पुढे ढकलला होता.