लागोपाठच्या विविध स्वरूपाच्या सामन्यांमुळेच भारतीय क्रिकेट संघास इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभवास सामोरे जावे लागले, असे भारताचे ज्येष्ठ गोलंदाज जवागल श्रीनाथ याने सांगितले.
पिअरसन एज्युकेशनतर्फे तळेगाव दाभाडे येथे आयोजित एका कार्यक्रमात श्रीनाथ म्हणाला, ‘‘भारतीय संघाला सध्या बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. ट्वेन्टी-२०, एकदिवसीय आणि आयपीएल सामने यामुळे खेळाडूंना अपेक्षेइतकी शारीरिक व मानसिक विश्रांतीच मिळत नाही. भारतीय संघ कसोटी सामन्यांमध्ये पुन्हा गौरवशाली कामगिरी करील असा मला आत्मविश्वास आहे.
भारतीय संघाकडे सध्या विजय मिळवून देणारा द्रुतगती गोलंदाज नाही, यावर श्रीनाथ म्हणाले, भारताने एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकला असला, तरी वेगवान गोलंदाज तयार करण्यासाठी ठिकठिकाणी अकादमी स्थापन करण्याची आवश्यकता आहे आणि अशा अकादमींमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधाही असणे जरुरीचे आहे. आम्ही कर्नाटकमध्ये ठिकठिकाणी अकादमी  सुरू केल्या आहेत आणि अशा अकादमींमधून क्रिकेटसाठी चांगले नैपुण्य शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.’’