भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील संघर्षाबद्दल सांगितले. २०१५ साली आयपीएल स्पर्धेत खेळण्यापूर्वी मी अनेक आर्थिक अडचणींचा सामना केल्याचे त्याने म्हटले. त्यावेळी आम्ही कर्ज काढून एक कार घेतली होती. मात्र, कर्जाचे हप्ते फेडायला पैसे नसल्यामुळे आम्ही ती कार लपवून ठेवल्याचे हार्दिकने सांगितले. यूट्युबवर गौरव कपूरच्या ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या शोमध्ये हार्दिकने दिलखुलास गप्पा मारल्या.

त्या काळात कारचा ईएमआय भरता यावा म्हणून मी मला मिळणारे सर्व पैसे साठवायचो. मी तब्बल तीन वर्ष अशाप्रकारच्या आर्थिक विवंचनेत काढली. त्यावेळी साधे पाच किंवा दहा रूपयेही खर्च करताना मी विचार करायचो. मला अजूनही आठवते की, सुरूवातीला आयपीएलमध्ये खेळताना मला ७० हजार रूपये मिळाले होते. त्यावेळी या पैशावर आपण काही दिवस काढू, असा आमच्या कुटुंबाचा अंदाज होता. जवळपास तीन वर्ष मी स्ट्रगल केला. आम्ही दोन वर्ष गाडीच्या कर्जाचे हप्तेही फेडले नव्हते. त्यामुळे बँकेकडून गाडी उचलून नेली जाण्याची भीती होती. त्यासाठी आम्ही आमची कार दोन वर्ष लपवून ठेवली होती. त्या तीन वर्षांमध्ये आमच्या कुटुंबातील प्रत्येकजण गाडीच्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी पैसे साठवत होता. कुठलीही नवीन गोष्ट विकत घेण्याऐवजी त्या तीन वर्षात आम्ही कारसाठी पैसे वाचवून ठेवले. तेव्हा आम्ही फक्त कर्जाचा हप्ता आणि जेवण या दोन गोष्टींचाच विचार करायचो, असे हार्दिकने सांगितले.

मात्र, मुंबई इंडियन्सने आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यानंतर माझे आयुष्यच बदलून गेले. देव खूप दयाळू आहे. आयपीएलमध्ये मी खेळायला लागलो आणि पहिल्याच वर्षी आमच्या संघाने स्पर्धा जिंकली. त्यावेळी मला ५० लाखांचा चेक मिळाला. तेव्हा मला मोफत कार मिळाली आणि मी एक कार विकतही घेतली. विचार करा, तीन महिन्यांपूर्वीच आम्ही पैशांसाठी खूप झगडत होतो आणि त्यानंतर लगेचच माझ्याकडे ५० ते ६० लाख रूपये आले. हे पैसे तेव्हा मला खूपच उपयोगी आले, असे हार्दिकने सांगितले.