England tour of india 2021: पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लडच्या संघाचं भारतामध्ये आगमन झालं आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे. यातील दोन कसोटी सामने चेन्नईत, उर्वरित दोन सामने आणि टी-२० मालिका अहमदाबाद तर वन-डे मालिका पुण्यात रंगणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान अखेरची कसोटी मालिका २०१८ मध्ये झाली होती. ही मालिका इंग्लंड संघानं ४-१ च्या फरकानं जिंकली होती. २०२१ मध्ये होणारी कसोटी मालिका जिंकून भारतीय संघ पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी पाहूयात भारताकडून कोणत्या फलंदाजानं सर्वाधिक मोठी खेळी केली आहे.

दोन्ही देशातील फलंदाजाचा विचार केल्यास इंग्लंडच्या ग्राहम गूच यांनी सर्वाधिक मोठी खेळी केली आहे. तर भारताकडून करुण नायर यानं मोठी खेळी केली आहे. विरेंद्र सेहवाग आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजाला न जमलेला विक्रम करुण नायरनं केला आहे. नायरने मायदेशात २०१६-१७ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यात ३०३ धावांची खेळी केली आहे. हा सामना चेन्नईत रंगला होता. भारताकडून त्रिशतक झळकावणारा करुण नायर दुसरा फलंदाज ठरला होता. विरेंद्र सेहवागनं भारतीय संघाकडून पहिलं त्रिशतक झळकावलं आहे. करुण नायरनं ३८१ चेंडूचा साना करताना ३०३ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान नायरनं ३२ चौकार आणि ४ षटकार लगावले होते. भारतीय संघानं हा सामना एक डाव आणि ७५ धावांनी जिंकला होता.

भारत -इंग्लंड यांच्यादरम्यान सर्वाधिक मोठी खेळी करणारे फलंदाज –
333 – ग्राहम गूच

303* – करुण नायर

294 – एलिएस्टर कुक

246* – ज्योफ बायकॉट

235 – विराट कोहली</p>

235 – इयान बेल

224 – विनोद कांबळी

222 – गुंडप्पा विश्वनाथ

221 – सुनील गावसकर</p>

आणखी वाचा- IND vs ENG : कधी-कुठे कसे पाहता येणार सामने, जाणून घ्या सर्वकाही

चेन्नईमध्ये भारतीय संघानं ३२ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये १४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ११ सामने अनिर्णित राखले आहेत. या मैदानावर भारतीय संघाला ६ सामन्यात पराभव पाहावा लागला आहे. चेन्नईच्या मैदानावर भारतीय संघानं इंग्लंडविरोधात सात गड्यांच्या मोबदल्यात ७५९ धावांचा डोंगर उभा केला होता. ही भारताची सर्वोत्तम धावसंख्या आहे.