हिमा दासचा अनोखा प्रवास

आसामातील एका खेडेगावात अन्य मुलांसमवेत फुटबॉल खेळणाऱ्या हिमा दासला आपण अ‍ॅथलेटिक्समध्ये जगज्जेतेपद मिळवू असे कधी वाटलेही नसेल. मात्र शेतकऱ्याच्या या मुलीने अ‍ॅथलेटिक्समध्ये कारकीर्द सुरू केल्यानंतर अहोरात्र कष्ट केले. त्यामुळेच जागतिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली महिला धावपटू झाली.

नागाव जिल्हय़ातील कंधुलिमारी गावात हिमाचे वडील रोंजित हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतातून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते. हिमाला तीन बहिणी व एक भाऊ आहे. तिची आई घरकाम करते. अतिशय काटक असलेल्या हिमाने फुटबॉलऐवजी मैदानी स्पर्धामध्ये भाग घेतला पाहिजे असे तिचे वडील सांगत असत. मैदानावर फुटबॉल खेळताना तिचे वेगवान कौशल्य पाहून शाळेतील शिक्षकांनी तिला निपोन दास या अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षकांच्या शिबिरात सहभागी होण्याचा सल्ला दिला.

निपोन यांनी तिला गुवाहाटी येथील अकादमीत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. घरापासून दीडशे किलोमीटर असलेल्या या शहरात तिला सरावासाठी सुरुवातीला तिच्या पालकांनी विरोध केला. मात्र तिच्याकडील नैपुण्य पाहून अखेर त्यांनी परवानगी दिली.

गुवाहाटी येथील शिबिरात दाखल झाल्यानंतर तिने फेडरेशन चषक स्पर्धेतील ४०० मीटर धावण्याचे सुवर्णपदक जिंकले. तिला राष्ट्रकुल स्पर्धेत सहावे स्थान मिळाले, मात्र तिने २० वर्षांखालील गटाचा ५१.१३ सेकंद हा राष्ट्रीय विक्रम मोडला. नुकत्याच झालेल्या आंतरराज्य अिजक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेची पात्रताही पूर्ण केली आहे. हिमाने मैदानी स्पर्धेत देशास अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाच्या यशाचे कौतुक करताना म्हटले आहे.

हिमाचे कौतुक करण्याऐवजी एएफआयकडून टीकाच

कनिष्ठ गटाच्या जागतिक मैदानी स्पर्धेत हिमा दासने ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवल्यानंतर भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने तिचे कौतुक करण्याऐवजी ती प्रसारमाध्यमांशी सफाईदारपणे इंग्लिश बोलू शकली नाही, हेच सांगत टीका केली. महासंघाने ट्विटरद्वारे म्हटले आहे, ‘‘हिमा, तू खूप चांगली धावलीस, मात्र प्रसारमाध्यमांशी इंग्रजीत बोलताना तू अडखळतच बोललीस.’’ समाजमाध्यमांनी महासंघावर टीका केल्यानंतर महासंघाने सर्वाची माफी मागितली.

स्वप्न साकार झाले – हिमा

‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक मिळवण्याचे माझे ध्येय होते. २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सोनेरी कामगिरी केल्यावर सुरुवातीला माझा विश्वासच बसला नाही, मात्र आपण सुवर्णपदक मिळविले आहे, हे लक्षात आल्यानंतर हातात तिरंगा ध्वज फडकवताना खूप अभिमान वाटला व एक स्वप्न साकार झाले. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सोनेरी कामगिरी करण्याचे माझे ध्येय आहे. २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वीची ती रंगीत तालीम आहे,’’ असे हिमाने सांगितले.