इंडोनेशियात पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये अॅथलेटिक्समध्ये ३ पदकांची कमाई करणाऱ्या हिमा दासचं, गुवाहटी विमानतळावर अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. हिमाच्या स्वागतासाठी विमातळावीरल कार्पेटला रनिंग ट्रॅकचं स्वरुप देण्यात आलं होतं. या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आशियाई खेळांमध्ये पदकाची कमाई केल्यानंतर हिमा पहिल्यांदा आपल्या घरी येत आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हिमा दासचं विमानतळावर उपस्थित राहून स्वागत केलं. मुख्यमंत्री कार्यालयातर्फे हिमाचा आज विशेष सत्कार करण्यात येणार आहे. भारतात आल्यानंतर हिमा व अन्य खेळाडूंनी क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

२०१८ हे साल हिमा दाससाठी चांगलं गेलं आहे. सर्वात प्रथण IAAF World Championship U-20 स्पर्धेत हिमा दासने सुवर्णपदकाची कमाई केली. आशियाई खेळांमध्ये हिमा दासने मिश्र रिले स्पर्धेत रौप्य, महिला रिले स्पर्धेत सुवर्ण तर वैय्यक्तिक प्रकारातही रौप्य पदकाची कमाई केली होती.