युरोपमध्ये तीन आठवडय़ांत पाच सुवर्णपदकांना गवसणी घालणारी भारताची अव्वल धावपटू हिमा दास आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जवळ आहे, असे मत भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाचे उच्च कामगिरी संचालक वोल्कर हेरमान यांनी व्यक्त केले.

हिमाने पोलंड आणि चेक प्रजासत्ताक येथे २०० मीटर शर्यतींमध्ये चार, तर ४०० मीटर शर्यतीत एका सुवर्णपदकाची कमाई करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. ‘‘हिमाची वाटचाल योग्य दिशेने होत आहे. ४०० मीटरचे अंतर ती ५० सेकंदांत पार करत असेल, तर २०० मीटरमध्येही ती २२.८० सेकंदांच्या आत सुवर्णपदकावर नाव कोरू शकते. ती आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीच्या समीप आहे,’’ असे हेरमान म्हणाले.

हिमाला दोहा येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरता आले नाही. या स्पर्धेसाठी २०० मीटरमध्ये २३.०२ सेकंद, तर ४०० मीटरमध्ये ५१.८० हे पात्रता फेरीचे निकष आहेत.