भारतीय अॅथेलॅटिक्ससाठी गुरुवारचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस ठरला. वेगवान धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला. IAAF वर्ल्ड अंडर २० अॅथेलॅटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत तिने ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावले. ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिला भारतीय महिला ठरली. १८ वर्षीय हिमाने ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करत स्पर्धा जिंकली.

या विजयानंतर देशभरात तिच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. आसाममधील धिंग येथे तिच्या गावी लोकांनी विजयोत्सव साजरा केला. आता तिच्या या ऐतिहासिक विजयाला सन्मानाची जोड मिळणार आहे. हिमा दास हिला लवकरच आसाम राज्याच्या क्रीडा विभागाचे सदिच्छादूत होण्याचा बहुमान प्राप्त होणार आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या संदर्भातील घोषणा केली आणि तिला शुभेच्छा दिल्या. तसेच राज्यस्तरीय कार्यक्रमा दरम्यान हिमाचा सत्कार करण्यात येईल आणि तिला रोख रकमेचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल असेही सोनोवाल यांनी सांगितले आहे. दरम्यान, आसाम अॅथेलॅटिक्स संघटनेकडून हिमाला २ लाखांचे रोख बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

‘आसामच्या कन्येने (हिमा) अत्यंत दुर्मिळ असे यश मिळवले आहे. तिने प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. तिचे अभिनंदन!’, असे मत मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले आहे.

आसामचे राज्यपाल प्रा. जगदीश मुखी यांनीही हिमाला शुभेच्छा दिल्या. इतर युवा धावपटू आणि खेळाडूंसाठी हिमाचा विजय हा प्रेरणेचा स्रोत आहे. कठीण प्रसंगावर मात करून आयुष्यात एक उंची गाठता येते हे तिने मिळवलेल्या विजयामुळे सिद्ध झाले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.