भारताची धावपटू हिमा दास सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. चेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत हिमाने ४०० मी. शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. गेल्या १९-२० कालावधीतलं हिमाचं हे पाचवं सुवर्णपदक ठरलं आहे. हिमा दासच्या कामगिरीची माहिती मिळताच संपूर्ण देशभरात तिचं कौतुक होतं आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक महत्वाच्या सेलिब्रेटींनी हिमाचं अभिनंदन केलं आहे. मात्र एका व्यक्तीने खास फोन करत हिमाचं कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय क्रिकेटचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने हिमाला स्वतः फोन करुन तिचं कौतुक केलं आहे. खुद्द हिमाने आपल्या अधिकृत फेसबूक पेजवर याची माहिती दिली आहे. तुमचे कौतुकाचे शब्द माझ्यासाठी मोलाचे आहेत, यापुढे ऑलिम्पिकसाठी मी असेच प्रयत्न करत राहीन अशा शब्दांमध्ये हिमाने सचिन तेंडुलकरला आश्वासन दिलं आहे.

याआधी सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही हिमाचं कौतुक केलं आहे.

जाणून घ्या हिमा दासच्या सुवर्णकामगिरीचा लेखाजोखा –

२ जुलैला पोजनान अ‍ॅथलेटिक्स
ग्रां. प्री. स्पर्धेत २०० मी. २३.६५ सेकंदासह शर्यतीत सुवर्ण.

७ जुलैला कुटनो अ‍ॅथलेटिक्स
मीट स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत २३.९७ सेकंदासह सुवर्ण.

१३ जुलै चेक प्रजासत्ताक
येथे क्लांदो अ‍ॅथलेटिक्स २०० मीटर शर्यतीत २३.४३ सेकंदासह सुवर्ण.

१८ जुलै, चेक प्रजासत्ताक
टबोर अ‍ॅथलेटिक्स मीट, २०० मीटर शर्यतीत २३.२५ सेकंदांसह सुवर्ण.

२० जुलै झेक प्रजासत्ताक
नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. ४०० मीटर शर्यतीत ५२.०९ सेकंदांसह सुवर्णपदक.