IAAF च्या २० वर्षांखालील अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक कमावून संपूर्ण देशाची मान उंचावणाऱ्या हिमा दासच्या मदतीसाठी केंद्र सरकार आता पुढे सरसावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीकोनातून हिमाची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या TOPS योजनेत निवड झाली आहे. या योजनेमार्फत ऑलिम्पिक पात्रतेसाठी लागणाऱ्या तयारीकरता हिमाला थेट निधी मिळणार आहे. फिनलँडमध्ये गुरुवारी हिमाने ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली होती.

यापुढे प्रत्येक महिन्याला हिमाला ५० हजाराची मदत मिळणार आहे. याचसोबत ऑलिम्पिकसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीत हिमाला केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे मदत मिळणार असल्याचं, Sports India च्या (पूर्वाश्रमीची ‘साई’ संस्था) महासंचालक नीलम कपूर यांनी सांगितलं आहे. आधीच्या नियमांनूसार हिमाला ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या आशियाई खेळांपर्यंत सरकारी मदत मिळणार होती. मात्र तिची कामगिरी पाहता क्रीडा मंत्रालयाच्या TOPS योजनेत तिची निवड करण्यात आलेली आहे.