भारतीय अॅथेलॅटिक्स विश्वासाठी गुरुवारचा दिवस महत्वाचा ठरला. वेगवान धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला. IAAF वर्ल्ड अंडर २० अॅथेलॅटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत तिने ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावले. ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिला भारतीय महिला ठरली. १८ वर्षीय हिमाने ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करीत स्पर्धा जिंकली.

या संदर्भात तिची एक मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत अॅथेलॅटिक्स फेडेरेशन ऑफ इंडिया (AFI) यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केली आणि त्या व्हिडियोखाली तिला शुभेच्छा देणारा संदेश लिहिला. मात्र संदेश लिहिताना AFIने चक्क हिमाला फारसं चांगलं इंग्रजी बोलता येत नाही, असे लिहिले. या ट्विटवरून AFI वर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार होत आहे. सुवर्णकन्या हिमा हीच पराक्रम मोठा आहे. या पराक्रमाचे कौतुक करताना तिला इंग्रजी येत नसल्याचे नमूद करण्याची काहीही गरज नव्हती, अशा पद्धतीची मते नेटकऱ्याकडून व्यक्त करण्यात आली.

स्पर्धेत ‘सुवर्ण’पराक्रम केल्यानंतर तिची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखती दरम्यान तिला इंग्रजी भाषेतून काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्याची उत्तर देताना हिमाची थोडी त्रेधातिरपीट उडाली. पण तिने प्रसंगावधान राखत स्वतःला सांभाळून घेतले. पण हा व्हिडीओ ट्विट करत असताना AFIने मात्र ‘हिमाला छान इंग्रजी बोलता येत नाही, पण तिने प्रयत्न चांगला केला’, असे खोचक ट्विट केले.

दरम्यान, या ट्विटमध्ये आम्हाला हिमाचा अभिमान वाटतो, असेही शेवट नमूद करण्यात आले आहे. आणि नंतर या ट्विटमागील उद्देशही त्यांनी स्पष्ट केला.

मात्र तोपर्यंत AFI लोकांच्या टिकेचे धनी ठरले होते.