ऋतुराजच्या अर्धशतकामुळे हिमाचल प्रदेशवर आठ गडी राखून मात

प्रतिभावान सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (नाबाद ८२) साकारलेल्या आणखी एका दिमाखदार अर्धशतकाच्या बळावर महाराष्ट्राने शुक्रवारी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत हिमाचल प्रदेशचा आठ गडी आणि सहा चेंडू राखून धुव्वा उडवला.

‘क’ गटात समावेश असलेल्या गतउपविजेत्या महाराष्ट्राचा हा सहा सामन्यांतून चौथा विजय ठरल्यामुळे बाद फेरी (सुपर लीग) गाठण्याच्या त्यांच्या आशा पल्लवित झाल्यात आहेत. प्रथम फलंदाजी करताना हिमाचलच्या फलंदाजांवर महाराष्ट्राच्या वेगवान गोलंदाजांनी अंकुश ठेवल्यामुळे त्यांना २० षटकांत ८ बाद १३५ धावाच करता आल्या. प्रशांत चोप्रा (२८) आणि अभिमन्यू राणा (२४) यांनी हिमाचलसाठी उपयुक्त योगदान दिले. महाराष्ट्रासाठी समद फल्लाह आणि सत्यजीत बच्छाव यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

प्रत्युत्तरात, सलामीवीर यश नाहर शून्यावर माघारी परतल्यावर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अनुभवी केदार जाधवच्या साथीने ऋतुराजने दुसऱ्या गडय़ासाठी ७४ धावांची भागीदारी रचून महाराष्ट्राचा डाव सावरला. केदार (३१) धावचीत होऊन माघारी परतल्यावर नौशाद शेखच्या (नाबाद २३) साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ६३ धावांची अभेद्य भागीदारी रचून ऋतुराजने महाराष्ट्राचा विजय साकारला. २२ वर्षीय ऋतुराजने ६१ चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या.

शनिवारी विश्रांतीचा दिवस असल्याने रविवारी पंजाबविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून महाराष्ट्र दिमाखात बाद फेरी गाठणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  ऋतुराजने स्पर्धेतील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने अरुणाचल प्रदेश आणि छत्तीसगडविरुद्ध अनुक्रमे ८१ आणि ६१ धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक

हिमाचल प्रदेश : २० षटकांत ८ बाद १३५ (प्रशांत चोप्रा २८, अभिमन्यू राणा २४; सत्यजीत बच्छाव २/२७) पराभूत वि. महाराष्ट्र : १९ षटकांत २ बाद १३८ (ऋतुराज गायकवाड नाबाद ८२, केदार जाधव ३१; पंकज जैस्वाल १/२६).

 गुण : महाराष्ट्र ४, हिमाचल प्रदेश ०