भारताचा जलतरणपटू साजन प्रकाशने शनिवारी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. रोम येथे सुरू असलेल्या सेटे कॉली करंडक जलतरण स्पर्धेत साजन ऑलिम्पिक पात्रतेचे ‘अ’ निकष गाठणारा भारताचा पहिला जलतरणपटू ठरला.

पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात २७ वर्षीय साजनने १:५६.३८ मिनिटांत निर्धारित अंतर गाठले. ऑलिम्पिक पात्रतेचे ‘अ’ निकष मिळवण्यासाठी १:५६.४८ मिनिटांत हे अंतर सर करणे गरजेते होते. साजनने ०.१० सेकंदापूर्वीच ही कामगिरी केली. त्याशिवाय साजनने स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. गेल्या आठवड्यात बेलग्रेड येथे झालेल्या स्पर्धेत साजननेच १:५६.९६ मिनिटांचा विक्रम नोंदवला होता.

मात्र साजनने पात्रतेचे ‘अ’ निकष मिळवल्यामुळे भारताचाच अन्य जलतरणपटू श्रीहरी नटराजचे ऑलिम्पिकचे स्वप्न धुळीस मिळाले. पुरुषांच्या १०० मीटर बटरस्ट्रोक प्रकारात नटराजला शुक्रवारी ०.५ सेकंदाने पात्रतेचे ‘अ’ निकष मिळवण्यात अपयश आले.