News Flash

विश्व कनिष्ठ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा : नाशिकच्या विदितला ऐतिहासिक कांस्य

नाशिकचा युवा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने कोकाएली, तुर्कस्तान येथे झालेल्या विश्व ज्युनियर बुद्बिबळ अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करण्याची करामत केली.

| September 28, 2013 02:16 am

नाशिकचा युवा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने कोकाएली, तुर्कस्तान येथे झालेल्या विश्व ज्युनियर बुद्बिबळ अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करण्याची करामत केली. आठव्या मानांकित विदितने अखेरच्या १३व्या फेरीत बरोबरी पत्करत कांस्यपदकाची कमाई केली. विश्व ज्युनियर स्पर्धेत पदक पटकावणारा तो महाराष्ट्राचा पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे.
विदितने १३व्या फेरीत काळ्या मोहऱ्यांसह खेळताना चीनच्या यू यांगयी याला बरोबरीत रोखले. पेरूच्या कोरी जॉर्ज याने अखेरच्या फेरीत भारताच्या पी. सेतूरामनचा पराभव करत विदितला ९.५ गुणांवर गाठले. पण विदितने ट्रायब्रेकरमधील सरस गुणांच्या आधारे जॉर्जला मागे टाकून कांस्यपदकावर मोहोर उमटवली. चीनच्या अव्वल मानांकित यू यांगयीने ११ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. तुर्कस्तानच्या अलेक्झांडर इपाटोव्हने सर्बियाच्या अलेक्झांडर इंजिक याला हरवत रौप्यपदक पटकावले. सेतूरामनला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
कारो कान पद्धतीने डावाची सुरुवात करणाऱ्या विदितला काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. अव्वल स्थान पटकावण्यासाठी यू यांगयीने हा डाव बरोबरीत सोडवण्यावर धन्यता मानली. ‘‘काही वर्षांपूर्वी १४ वर्षांखालील विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतरची ही माझी सर्वोत्तम कामगिरी ठरली,’’ असे विदितने पदक पटकावल्यानंतर सांगितले. विदितने पूर्वीचे प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजित कुंटे म्हणाले, ‘‘येत्या दोन-तीन वर्षांत २७०० एलो रेटिंग गुणांपर्यंत पोहोचण्याची क्षमता विदितमध्ये नक्कीच आहे. तो पी. हरिकृष्णच्या पठडीतील बुद्धिबळपटू आहे. डावाची सुरुवात करण्याची त्याची पद्धत सुरेख आहे. पण डावाच्या सुरुवातीवर तो अवलंबून नसल्यामुळे त्याला फार कठोर मेहनत घेण्याची गरज नाही.’’
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ग्रँडमास्टर किताब पटकावणाऱ्या विदितने पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये चार गुणांची कमाई केली होती. पण नंतरच्या सात फेऱ्यांमध्ये त्याने ५.५ गुण पटकावत कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेतून १७ रेटिंग गुण मिळवत विदितने आपले एलो रेटिंग २५८० गुणांवर नेले. सीरियामधील राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर ही स्पर्धा हताय येथून कोकाएली येथे हलवण्यात आली होती.
भारताचा ग्रँडमास्टर सहज ग्रोवरला संयुक्त अरब अमिरातीच्या ए. आर. सालेह सालेम याच्याविरुद्ध चांगली कामगिरी करता आली
नाही.  देबाशीश दासला अखेरच्या फेरीत बरोबरीवर समाधान मानावे लागल्यामुळे ग्रँडमास्टर किताब निश्चित करण्यासाठी त्याला पुढील स्पर्धेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.महिलांमध्ये, भारताच्या पद्मिनी राऊत हिने आठव्या स्थानावर मजल मारली.
काही वर्षांपूर्वी १४ वर्षांखालील विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतरची ही माझी सर्वोत्तम कामगिरी ठरली. या स्पर्धेत जोमाने पुनरागमन करत मी पदक पटकावले. स्पर्धेआधीच्या विशेष प्रशिक्षण शिबिरात एव्हगेनी व्लादिमिरोव्ह यांचे मिळालेले मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांच्यामुळे मला स्पर्धेसाठी जय्यत तयारी करता आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 2:16 am

Web Title: historic world junior chess bronze for vidit gujrathi
Next Stories
1 पटेल सचिवपदी कायम; रवी सावंत यांच्याबाबत प्रश्नचिन्ह
2 सावधान, माही वादळ घोंघावतंय!
3 इंडिया ‘ब्ल्यू’ संघाचा विजय
Just Now!
X