अ‍ॅथलेटिक्स हा पदकांची लयलूट करण्यासाठी असलेला हुकमी क्रीडा प्रकार मानला जातो. मात्र भारतीय खेळाडू ऑलिम्पिक असो किंवा राष्ट्रकुल क्रीडा असो, अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अव्वल यशापासून दूरच असतात. आजपर्यंत या क्रीडा प्रकारात भारताला अपेक्षेइतके उज्ज्वल यश मिळविता आलेले नाही. आशियाई अजिंक्यपद स्पर्धा किंवा आशियाई ऑल स्टार स्पर्धा अशा स्पर्धामध्ये घवघवीत यश मिळविणारे भारतीय धावपटू राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये मानसिक दडपण घेत निराशाजनक कामगिरी करतात असाच अनुभव आहे. गतवेळी सुवर्णवेध घेणारी कृष्णा पूनिया (थाळीफेक), आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता विकास गौडा (थाळीफेक), लंडन ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणारे सहाना कुमारी (उंच उडी), मायुखा जॉनी (लांब उडी), ओमप्रकाश क ऱ्हाना (गोळाफेक) यांच्याकडून वैयक्तिक प्रकारात पदकांची अपेक्षा आहे. गतवेळी नवी दिल्ली येथे घरच्या मैदानावर ४ बाय ४०० मीटर रिले शर्यत जिंकणाऱ्या महिला संघाकडून याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची आशा आहे.
इतिहास निराशाजनकच!
आजपर्यंत भारताने या हुकमी क्रीडा प्रकारात ३ सुवर्ण, ८ रौप्य व ११ कांस्य अशी एकूण २२ पदकांची कमाई केली आहे. १९५८मध्ये मिल्खा सिंग यांनी ४४० यार्ड्स अंतराच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर ५२ वर्षांनी कृष्णा पूनिया हिने दिल्लीत सोनेरी कामगिरी केली. तसेच महिलांच्या रिले शर्यतीत भारताला विजेतेपद मिळाले. भारताच्या खात्यात एवढीच सुवर्णपदके आहेत. भारतापेक्षा आकाराने व लोकसंख्येत लहान असलेले जमैका यांच्यासह अनेक देश या स्पर्धेत पदकांची रास करतात.
आव्हान सोपे नाही!
गतवेळी भारताला घरच्या मैदानावरील स्पर्धेचा मानसिक लाभ झाला होता. यंदा त्याचा अभाव असणार आहे. जमैका, त्रिनिदाद व टोबॅको, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा तसेच अनेक आफ्रिकन देशांच्या धावपटूंना भारताला सामोरे जावे लागणार आहे.