आयपीएलचा आलेख घसरत असताना ‘प्रो-कबड्डी’च्या लिलावाने लक्ष लक्ष उड्डाणे घेतली. ‘लख लख चंदेरी तेजाने’ उजळलेल्या पहिल्या लिलावात भारतीय रेल्वेच्या राकेश कुमारला सर्वाधिक १२ लाख ८० हजार रुपयांची बोली लावून पाटणा संघाने सर्वाचे लक्ष वेधले. पाच खेळाडूंना १२ लाखांहून अधिक, तर एकंदर १३ खेळाडूंना दहा लाखांहून अधिक भाव मिळाल्याने ‘अच्छे दिन आयेंगे..’ ही ग्वाही ‘प्रो-कबड्डी’ लीगच्या पहिल्यावहिल्या लिलावाने समस्त क्रीडाक्षेत्राला दिली.
राकेश कुमारपाठोपाठ भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा चढाईपटू दीपक निवासला तेलुगू टायटन्सकडून १२ लाख ६० हजार रुपये इतका भाव मिळाला. याचप्रमाणे अजय ठाकूर (बंगळुरू बुल्स) आणि सुरजित नरवाल (दिल्ली) यांनी १२ लाख २० हजार रुपयांची बोली जिंकली.
काशिलिंग आडकेला दहा लाखांचा भाव
हनुमानउडीसाठी खास ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या काशिलिंग आडकेने महाराष्ट्रातील खेळाडूंमध्ये सर्वाधिक दहा लाखांची बोली जिंकली आहे. याचप्रमाणे महाराष्ट्राच्या एकंदर १० खेळाडूंना या लीगने लक्षाधीश केले आहे, तर दोन खेळाडूंना वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला आहे.
पाकिस्तानचे खेळाडू प्रो-कबड्डीमध्ये खेळणार
पाकिस्तानच्या चार खेळाडूंनी प्रो-कबड्डीच्या लिलावामध्ये सर्वाचे लक्ष वेधले. पाटणा संघाने वासिम सज्जादला सर्वाधिक ५.२० लाखांना खरेदी केले. याशिवाय अतिफ वहीद, वाजिद अली (दोन्ही तेलुगू टायटन्स ) आणि नासिर अली (जयपूर पिंक पँथर्स) या तिघांवर फ्रेंचायझींनी आत्मविश्वासाने बोली लावली आहे. पाकिस्तानी खेळाडूंना भारतात प्रो-कबड्डीचे सामने खेळण्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही संयोजकांनी दिली आहे.