तमाम फुलबॉल चाहत्यांचं लक्ष लागून असलेल्या यूरो कप २०२० स्पर्धेला आज मध्यरात्रीपासून सुरुवात होत आहे. दर चार वर्षांनी आयोजित होत असलेली स्पर्धा गेल्या वर्षी करोना संकटामुळे होऊ शकली नाही. मात्र यंदा या स्पर्धेचं कडक नियमावलीसह आयोजन करण्यात आलं आहे. फिफा विश्व चषकानंतर ही फुटबॉलमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेकडे मिनी वर्ल्ड कप म्हणूनही पाहीलं जातं. या स्पर्धेनिमित्त यूरोपातील दिग्गज संघ आमनेसामने असतात. आतापर्यंत या स्पर्धेचं दोन देश मिळून आयोजन करत होते. मात्र करोना संकटामुळे यंदा पहिल्यांदाच ११ देश मिळून या स्पर्धेचं आयोजन करत आहेत. यात अजरबैजान, डेनमार्क, इंग्लंड, जर्मनी, हंगेरी, इटली, नेदरलँड, रोम, रशिया, स्कॉटलँड आणि स्पेन या देशांचा समावेश आहे. या स्पर्धेत २४ संघानी सहभाग घेतला असून ११ जुलै रोजी अंतिम सामना रंगणार आहे.

यूरो कपचा इतिहास

फ्रेंच फुटबॉल फेडरेशनचे व्यवस्थापक हेनरी डेलॉने यांनी १९२७ साली सर्वप्रथम या स्पर्धेची संकल्पना मांडली. त्यानंतर या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी UEFA च्या जनरल सेक्रेटरीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र या स्पर्धेला पूर्ण स्वरूप प्राप्त होण्यासाठी ३१ वर्षांचा कालावधी लागला. या स्पर्धेचं स्वप्न ज्यांनी पाहिलं ते हेनरी डेलॉने यांचं स्पर्धेपूर्वी १९५५ साली निधन झालं. त्यानंतर या स्पर्धेच्या आयोजनाला खिळ बसते की काय? असा प्रश्न उपस्थित झाला. १९५८ साली या स्पर्धेच्या आराखड्याला अंतिम स्वरूप प्राप्त झालं. त्यानंतर पहिल्या यूरो कप स्पर्धेचं १९६० साली आयोजन करण्यात आलं. १९६० साली या स्पर्धेचं नाव ‘यूरोपियन नेशंस कप’ असं होतं. त्यानंतर १९६८ साली या स्पर्धेचं नाव ‘UEFA यूरोपियन चॅम्पियनशिप’ केलं गेलं. हेनरी यांनी या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली होती. त्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेच्या चषकावर ‘चॅम्पियोनाट डी यूरोप’ आणि ‘कूप हेनरी डेलॉने’ असं नाव कोरण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा चषक तयार करण्याची जबाबदारी हेनरी यांचा मुलगा पिअरे याच्याकडे देण्यात आली होती. २००८ साली यूरो चषकात बदल करण्यात आला. या चषकाचा आकार वाढवण्यात आला. हा चषक ८ किलो वजन असून संपूर्ण चांदीत तयार केला गेलेला आहे.

युरोपियन वर्चस्वासाठी २४ संघांत जुगलबंदी!

UEFA Euro Cup फुटबॉल स्पर्धा

१९६० साली आयोजित केलेल्या पहिल्या स्पर्धेत केवळ चार संघांनी सहभाग घेतला होता. चेकोस्लोवकिया, फ्रान्स, सोवियत यूनियन आणि यूगोस्लाविया या देशांचा सहभाग होता. इंग्लंड, पश्चिम जर्मनी आणि इटलीसारख्या संघांनी या स्पर्धेत खेळण्यास लाल दिवा दाखवला होता. त्यामुळे या स्पर्धेसाठी आवश्यक असलेले १६ संघ मिळवणं कठीण झालं होतं. त्यामुळे चार संघात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या स्पर्धेत सोवियत यूनियनने यूगोस्लावियाला पराभूत करत चषक आपल्या नावावर केला होता. १९७६ पर्यंत या स्पर्धेत ४ संघ सहभागी होत होते. १९८० साली पहिल्यांदा ८ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर १९९६ साली या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला. २०१६ साली या स्पर्धेत २४ संघ सहभागी झाले. यंदाच्या स्पर्धेतही २४ संघांनी सहभाग घेतला आहे.

UEFA Euro Cup जिंकणारे संघ

  • स्पेननं तीनवेळा UEFA Euro Cup आपल्या नावावर केला आहे. १९६४, २००८ आणि २०१२ साली विजय मिळवला आहे.
  • जर्मनीने तीनवेळा UEFA Euro Cup जिंकला आहे. १९७२, १९८० आणि १९९६ साली चषक आपल्या नावावर केला आहे.
  • फ्रान्सने दोन वेळा UEFA Euro Cup आपल्या नावावर करण्यात यश मिळवलं आहे. १९८४ आणि २००० साली त्यांनी या स्पर्धेत बाजी मारली.
  • इटली (१९६८), पोर्तुगल (२०१६), डेनमार्क (१९९२), नेदरलँड (१९८८), ग्रीस (२००४), चेक रिपब्लिक (१९७६) आणि सोवियत यूनियनने (१९६०) या सालात चषक आपल्या नावावर केला आहे.

फुटबॉलसमोर क्रिकेट ‘फेल’, IPLपेक्षा ११ हजार कोटींनी नफा कमावणाऱ्या स्पर्धेला होतेय सुरुवात!

२०२१ असूनही UEFA Euro Cup २०२० असं नाव का?

यूरो कप २०२०चं आयोजन गेल्या वर्षी होणार होतं. मात्र करोना संकटामुळे गेल्या वर्षीचं आयोजन टाळण्यात आलं. मात्र तरीही या स्पर्धेचं नाव UEFA Euro Cup २०२० ठेवायचा प्रस्ताव कार्यकारी समितीने मंजूर केला. २०२० साली या स्पर्धेला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने या स्पर्धेची रुपरेषा आखण्यात आली होती. त्यासाठी या स्पर्धेचं नाव UEFA Euro Cup २०२१ ऐवजी UEFA Euro Cup २०२० असंच ठेवण्यात आलं आहे.