25 January 2021

News Flash

Hockey Champions Trophy – भारताचा विजयी चौकार, सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर ४-० ने मात

सामन्यात एकही गोल करणं पाकिस्तानला जमलं नाही

भारत ४ पाकिस्तान ०

नेदरलँडच्या ब्रेडा शहरात खेळवण्यात येत असलेल्या हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४-० ने मात करुन भारताने या स्पर्धेत आपलं खातं उघडलं आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेने आखून दिलेल्या वेळापत्रकानूसार, हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीची ही शेवटची स्पर्धा असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्नशील असणार आहे. भारताकडून रमणदिप सिंह, दिलप्रीत सिंह, मनदीप सिंह आणि ललित उपाध्याय यांनी भारतासाठी १-१ गोल झळकावला.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी सावध पवित्रा आजमावत, एकमेकांच्या चाली समजण्यासाठी वेळ घालवला. पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय संघाची आघाडीची फळी ही अधिक सजगतेने खेळताना दिसली. मात्र पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची संधी साधणं भारताच्या ड्रॅगफ्लिकर्सना काही केल्या जमलं नाही. पहिल्या सत्राच्या अखेरीस व दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला गोल करण्याच्या सुरेख संधी भारताने वाया घालवल्या. मात्र रमणदिप सिंहने २५ व्या मिनीटाला सुरेख मैदानी गोल झळकावत भारताचं खातं उघडलं. सिमरनजीत सिंहने दिलेल्या पासवर रमणदीप सिंहने योग्य संधी साधत बॉलला गोलपोस्टची दिशा दाखवली. पाकिस्तानी गोलकिपर इम्रान बटच्या पायामधून चेंडू गोलपोस्टमध्ये गेला. यानंतर मध्यांतरापर्यंत भारताकडे १-० अशी आघाडी होती.

तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीस पाकिस्तानने गोल करुन सामन्यात बरोबरी साधली. मात्र भारतीय खेळाडूंनी घेतलेल्या आक्षेपानंतर, पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावला. तिसऱ्या पंचांनी केलेल्या तपासणीत पाकिस्तानचा गोल अवैध ठरवण्यात आला. यापाठोपाठ पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची आणखी एक संधी मिळाली, मात्र भारतीय बचावफळीच्या समोर त्यांची डाळ शिजु शकली नाही. गोल करण्याच्या अधिक संधी मिळवण्यासाठी पाकिस्तानी आक्रमणपटूंनी मैदानाच्या उजव्या बाजूने भारताच्या गोलपोस्टवर हल्ले करण्यास सुरुवात केली. मात्र भारताच्या भक्कम बचावफळीने पाकिस्तानचं प्रत्येक आक्रमण परतावून लावलं.

भारतीय संघाच्या बचावात श्रीजेश, सरदार सिंह, अमित रोहिदास, चिंगलीन साना, सुरेंद्र कुमार या खेळाडूंनी मोठा वाटा उचलला. पाकिस्तानी खेळाडू रचत असलेल्या चाली अचूक हेरुन भारतीय खेळाडूंनी भारताचा गोलपोस्ट सुरक्षित ठेवला. यानंतर पाकिस्तानने गोलकिपर इम्रान बटला मैदानातून हटवून आणखी एक खेळाडू जादा खेळवण्याचा निर्णय घेतला. याचाच फायदा घेत, वरुण कुमारच्या पासवर दिलप्रीत सिंहने ५४ व्या मिनीटाला भारतासाठी दुसरा गोल झळकावला. १७ वर्षीय दिलप्रीत भारतासाठी गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलाय.

यानंतर पाकिस्तानी खेळाडूंचं सामन्यावरचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं. या विस्कटलेल्या बचावफळीचा फायदा घेत भारताकडून मनदीप सिंहने ५७ व्या आणि ललित उपाध्यायने हुटर वाजण्याच्या एक सेकंद आधी म्हणजेच ५९ व्या सेकंदाला गोल करत भारताच्या ४-० अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं. उद्या या स्पर्धेत भारताची गाठ रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 7:39 pm

Web Title: hockey champions trophy breda netherlands india beat arch rival pakistan by 4 0 register their first win
टॅग Hockey India
Next Stories
1 यो-यो टेस्ट पास करणाऱ्यालाच टीम इंडियात स्थान-रवी शास्त्री
2 दुबई मास्टर्स कबड्डी २०१८ – सलामीच्या सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात
3 वनडेत दोन नवे चेंडू म्हणजे गोलंदाजांच्या अपयशाला आमंत्रणच-सचिन तेंडुलकर
Just Now!
X