सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर ४-० ने मात केल्यानंतर भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीत आपली विजयी परंपरा कायम राखली आहे. दुसऱ्या साखळी सामन्यात भारताने आज, रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटीनावर २-१ ने मात केली. भारतीय संघाचा कर्णधार सरदार सिंहचा हा ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात अर्जेंटीनासारख्या संघावर मात करुन भारताने सरदारला ३०० व्या सामन्याचं गिफ्ट दिलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

पहिल्या सत्रात अर्जेंटीनाने सुरुवातीपासून आक्रमक खेळी करुन भारतावर दबाव वाढवायला सुरुवात केली होती. मात्र पी. आर. श्रीजेश आणि बचावफळीने अर्जेंटीनाची सर्व आक्रमणं परतवून लावली. पहिल्या सत्रात भारताचा संघ काहीसा पिछाडीवर पडलेला दिसला, मात्र भारताने अर्जेंटीनाला गोल करण्याचीही संधी दिली नाही. अखेर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या काही क्षणांमध्येच भारताने गोलपोस्टवरील कोंडी फोडली.

१७ व्या मिनीटाला भारताच्या हरमनप्रीतसिंहने पेनल्टी कॉर्नवर गोल करुन भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. भारताच्या या आक्रमणामुळे अर्जेंटीनाचा संघ सामन्यात काहीसा पिछाडीवर गेला. मध्यंतरीच्या काळात अर्जेंटीनाच्या खेळाडूंनी स्वतःला सावरत भारतावर पुन्हा हल्ले करण्यास सुरुवात केली. मात्र सरदार सिंह, वरुण कुमार, अमित रोहिदास या खेळाडूंनी भारतीय गोलपोस्टचा भक्कम बचाव केला. पाठोपाठ वरुण कुमारने दिलेल्या स्कुपवर दिलप्रीत सिंहने संधी साधून चेंडू मनदीप सिंहच्या दिशेने सरकवला. मनदीपने कोणतीही चूक न करत बॉल गोलपोस्टमध्ये ढकलत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

२-० अशा आघाडीमुळे अर्जेंटीनाचा संघ सामन्यात पुन्हा आक्रमक पवित्रा घेणार हा भारताचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. २९ व्या मिनीटाला अर्जेंटीनाच्या गोंझोले पेयाटने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन भारताची आघाडी २-१ अशी कमी केली. श्रीजेशच्या डाव्या बाजूने मारलेला जोरदार फटका हा काही क्षणांमध्ये गोलपोस्टमध्ये जाऊन विसावला. यानंतर सामना संपेपर्यंत अर्जेंटीनाने बरोबरी साधण्याचे अथक प्रयत्न केले, मात्र भारतीय बचावफळीने त्यांचे मनसुबे उधळून लावले. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना २७ जूनरोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.