इंग्लंडविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारताला चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेतील तिसऱ्या लढतीत बेल्जियमच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

भारताने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनीला ३-३ असे बरोबरीत रोखले होते. त्यानंतर दुसऱ्या लढतीत त्यांनी इंग्लंडला २-१ असे हरवले होते. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये भारताने चार गुणांची कमाई केली आहे. साखळी गटात ऑस्ट्रेलियानेही तेवढेच गुण मिळवले आहेत. त्यांनी दुसऱ्या सामन्यात दक्षिण कोरियाला ४-२ असे हरवले. त्याआधी त्यांना पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध गोलशून्य बरोबरी स्वीकारावी लागली होती.  गेल्या आठ सामन्यात भारताने बेल्जियमला दोन वेळा नमवले आहे.  क्रमवारीत बेल्जियमला पाचवे मानांकन असून भारताला सातवे स्थान आहे.