चुरशीच्या लढतीत भारताने दक्षिण कोरियावर २-१ अशी मात करीत चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत बाद फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमध्ये भारताचा हा दुसरा विजय आहे.

या सामन्याच्या पूर्वार्धात एकही गोल झाला नाही. उत्तरार्धात सामन्याच्या ३९व्या मिनिटाला एस. व्ही. सुनीलने भारताचे खाते उघडले. शेवटची तीन मिनिटे बाकी असताना कोरियाच्या जुंग किमने गोल करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. परंतु त्यानंतर ३० सेकंदांत निक्कीन थिमय्याने गोल करीत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

सामन्याच्या सुरुवातीपासून भारताने आक्रमक पवित्रा घेतला होता. पूर्वार्धात भारताला एकही गोल नोंदवता आला नाही. त्यांच्या आघाडी फळीतील खेळाडूंनी काही चांगल्या चाली केल्या. कोरियाच्या गोलपोस्टपर्यंत त्यांनी अनेक वेळा जोरदार मुसंडी मारली होती. कोठाजित सिंग, एस.रघुनाथ, देविंदर वाल्मीकी, निक्कीन थिमय्या यांनी एकमेकांमध्ये चांगला समन्वय ठेवला होता. तथापि, गोलपोस्टजवळ भारतीय खेळाडूंनी फाऊल्स करीत या संधी वाया घालविल्या. कोरियाच्या खेळाडूंनी बराच वेळ बचावात्मक खेळावरच भर दिला होता. त्यांच्या जेई चुआन युंगला एक हुकमी संधी मिळाली होती, मात्र त्याचा उपयोग त्याला करता आला नाही. पूर्वार्ध संपण्यास एक मिनिट बाकी असताना कोरियाच्या खेळाडूंनी भारतीय गोलाजवळ धडक मारली होती. मात्र भारताचा गोलरक्षक पी.श्रीजेश याने ही चाल असफल ठरवीत भारतीय संघावरील संकट दूर केले. पूर्वार्धात दोन्ही संघांना एकही पेनल्टी कॉर्नर मिळाला नाही.

उत्तरार्धातही सुरुवातीपासून भारतीय खेळाडूंनी वेगवान खेळाचा पवित्रा घेतला. कोरियाच्या तुलनेत त्यांच्या चालीत अधिक परिपक्वता होती. अखेर सामन्याच्या ३८व्या मिनिटाला भारताला गोल करण्याची सुवर्णसंधी लाभली. आकाशदीप सिंग व एस. व्ही. सुनील यांनी केलेली चाल रोखण्यासाठी कोरियन गोलरक्षक पुढे आला. त्याला चकवत सुनीलने शिताफीने चेंडू गोलात ढकलला व संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चार मिनिटांनी भारताला आघाडी वाढवण्याची संधी मिळाली होती, मात्र त्यांनी पेनल्टी कॉर्नर वाया घालवला. भारताला आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु त्याचे रूपांतर गोलात करण्यात पुन्हा त्यांना अपयश आले. दोन्ही वेळा भारतीय खेळाडूंनी खूपच कमकुवत फटके मारून या संधींवर पाणी सोडले.

सामन्याची तीन मिनिटे बाकी असताना भारताच्या बचाव फळीतील चुकांचा फायदा घेत कोरियाच्या किम याने सुरेख गोल केला. या गोलमुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. परंतु लगेचच भारतीय खेळाडूंनी कोरियाच्या गोलापर्यंत धडक मारली. तलविंदर सिंगने दिलेल्या पासवर निक्कीनने कोणतीही चूक न करता चेंडू गोलात ढकलला. या आघाडीनंतर भारतीय खेळाडूंनी बचावात्मक खेळावर भर दिला व कोरियाच्या चाली रोखल्या.