23 ते 30 मार्च दरम्यान मलेशियात रंगणाऱ्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. मनप्रीत सिंहकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं असून, यंदाच्या स्पर्धेत भारताचे बहुतांश खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. 2018 हे वर्ष भारतीय हॉकीसाठी चांगलं गेलेलं नाहीये. त्यातच प्रशिक्षक हरेंद्रसिंहांना विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत, भारतीय संघासमोर मोठं आव्हान असणार आहे.

भारत आणि यजमान मलेशियाव्यतिरीक्त कॅनडा, कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि जपान हे संघ या स्पर्धेत सहभागी होतील. एस.व्ही. सुनील, आकाशदीप सिंह, रमणदीप सिंह, ललित उपाध्याय, रुपिंदपाल सिंह, हरमनप्रीत सिंह हे सर्व खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीयेत. त्यामुळे या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरणाऱ्या भारतीय संघाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे.

सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेसाठी असा असेल भारतीय संघ –

गोलकिपर – पी. आर. श्रीजेश, क्रिशन बहादूर पाठक

बचावफळी – गुरिंदर सिंह, सुरेंद्र कुमार (उप-कर्णधार), वरुण कुमार, बिरेंद्र लाक्रा, अमित रोहिदास, कोठाजीत सिंह

मधळी फळी – हार्दिक सिंह, निलकांत शर्मा, सुमीत, विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंह (कर्णधार)

आघाडीची फळी – मनदीप सिंह, सिमरनजीत सिंह, गुरजंत सिंह, शैलेंद्र लाक्रा, सुमीत कुमार