भारताने जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या हॉकी कसोटी सामन्यात ३-१ असा शानदार विजय मिळवण्याचा पराक्रम दाखवत मालिकेवरसुद्धा ३-१ अशी विजयी मोहोर उमटवली आहे.
पर्थ येथे रविवारी झालेल्या लढतीत भारतीय खेळाडूंनी शानदार खेळ केला. दुसरा व तिसरा सामना जिंकून भारताने शनिवारी २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे शेवटच्या सामन्याविषयी कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. १३व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने पेनल्टी कॉर्नरद्वारा संघाचे खाते उघडले. दुसऱ्या डावाअखेर भारताने ही आघाडी राखली होती.
तिसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या थॉमस क्रेग याने ३६व्या मिनिटाला गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. त्याने पेनल्टी कॉर्नरद्वारा हा गोल केला. शेवटच्या डावात सामन्याच्या ५०व्या मिनिटाला पुन्हा आकाशदीप याने गोल करीत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ तीन मिनिटांनी एस. के. उथप्पाने आणखी एक गोल करीत भारताची बाजू भक्कम केली. उर्वरित खेळात कांगारूंनी धारदार आक्रमण केले, मात्र भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने सुरेख गोलरक्षण करीत या चाली परतविण्यात यश मिळविले.